Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Sangli › पाणीयोजनांतील गैरव्यवहारांबद्दल फौजदारी करा

पाणीयोजनांतील गैरव्यवहारांबद्दल फौजदारी करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

वर्षानुवर्षे रखडलेल्या वाळवा तालुक्यातील पाणी योजनांचा पंचनामा सोमवारी  पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत झाला. या योजनांवरील कोट्यवधी निधी नेमका कुठे मुरला, याची चौकशी करून संबंधितांवर तातडीने फौजदारी दाखल करा. त्यांच्या जमिनीवर बोजा चढवून पैसे वसूल करा, असा आदेश ना. खोत यांनी अधिकार्‍यांना दिला. आढावा बैठकीला गैरहजर राहणार्‍या कुंडलवाडीच्या ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा आदेशही त्यांनी दिला. 

येथील राजारामबापू नाट्यगृहात सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक  झाली. सहा तास चाललेल्या या  बैठकीत पाणीपुरवठा योजनांवरच तीन तास चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे अभियंता बारटक्के, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे गटनेते राहुल महाडिक, नगरसेवक विक्रम पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तहसीलदार नागेश पाटील, पोलिस उपअधीक्षक किशोर काळे  उपस्थित होते. 

बैठकीस गैरहजर  व नियुक्‍तीच्या ठिकाणीही गैरहजर असणार्‍या कुंडलवाडी येथील ग्रामसेवकाचे निलंबन, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी विजय पाटील व कुंभार यांच्या दोन वेतनवाढी  रोखण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला.  तसेच ज्यांच्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्या त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी दाखल  करण्याचा आदेशही त्यांनी  दिला. 
अधिकार्‍यांनी  ही कारवाई तातडीने न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

पाणी योजनेचा ताळेबंद वेळेत न दिल्याने येडेनिपाणीची पाणीपुरवठा समिती बरखास्त करू ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेशही देण्यात आला. अनेक गावच्या योजना अपूर्ण असतानाही अधिकार्‍यांनी चुकीचा अहवाल दिल्याबद्दल त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. योजना अपूर्ण असतानाही ठेकेदाराला बिले देणार्‍या पाणीपुरवठा समितीचीही चौकशी करून त्यांच्यावर  तातडीने फौजदारी दाखल करण्याच्या सूचना दिल्या. 
अभिजीत राऊत यांनीही शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे काही योजना रखडल्याचे तसेच लेखा परीक्षण अहवालातही या योजनेवरील खर्चाबाबत कडक ताशेरे ओढल्याचे  सांगितले.

Tags : 


  •