Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Sangli › आणखी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

आणखी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:19PMसांगली : अभिजित बसुगडे

अनिकेत कोथळे खूनप्रकरणाने नवीन वळण घेतले असून याप्रकरणी आणखी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सीआयडीने याप्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली आहे. दरम्यान या खूनप्रकरणाचे आरोपपत्र दि. 5 फेब्रवारीला न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आता पुरवणी आरोपपत्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये या दोन पोलिसांनी कामटेसह त्याच्या साथीदारांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. पुरवणी आरोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल होण्याचीही शक्यता आहे.   

वाटमारीप्रकरणी अनिकेतसह अमोल भंडारेला दि. 5 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांचीही रवानगी पोलिस कोठडीत झाली. पोलिसांकडून  कोणत्याही गुन्ह्यातील संशयिताकडे शक्यतो रात्री उशीरा चौकशी करण्यात येते. पोलिसी खाक्याची अधिक चर्चा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मात्र अनिकेतवर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यानच थर्ड डिग्री वापरण्यास सुरुवात करण्यात आली. 

कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा खून करून मृतदेह दोनदा जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर अमोलला पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्याने सांगितलेल्या घटनाक्रमावरून नंतर कामटेसह सहाजणांविरोधात खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी अमोलचा जबाब महत्वाचा ठरला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 

सीआयडीने याप्रकरणी कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळेला अटक केली. त्यामुळे या प्रकरणात  अटक केलेल्यांची संख्या सातवर पोहोचली होती. सध्या बाळासाहेब कांबळे जामिनावर बाहेर आहे.  
कामटेसह संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सीआयडीने अन्य संशयितांवर वॉच ठेवला आहे. दरम्यान सीआयडीच्या पथकाने अमोल भंडारेकडे कारागृहात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले. त्यानुसार तपास करून सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.    अमोल भंडारे याच्याकडे तसेच काही पोलिसांकडे सीआयडीने कसून चौकशी केली. त्यातून आणखी काही संशयितांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत दोन पोलिसांना अटक होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस वर्तुळातदेखील जोरदार चर्चा आहे.

मृतदेह घेऊन गाडी मिरजेत

अनिकेतचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गाडीत ठेवून कामटेसह त्याचे साथीदार सांगली शहरात फिरत असल्याचे सांगितले जात होते. मात्र तो मृतदेह घेऊन ती गाडी मिरजेतही गेल्याची चर्चा आहे. कामटे मिरजेत कोणाकडे गेला होता. तेथे त्याने कोणाशी चर्चा केली. यावेळी त्याला कोणी सल्ला दिला का याबाबतही पुरवणी आरोपपत्रात खुलासा होण्याची  शक्यता आहे. त्यामुळे सीआयडीच्या पुरवणी आरोपपत्राकडे सर्वांचे लक्ष  आहे. 

ठोस माहितीअभावी ते दोघे कारवाईपासून दूर...

सीआयडीच्या अधिकार्‍यांनी  अमोल भंडारेकडे  कारागृहात चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिस मुख्यालयात दिलेली माहिती आणि सीआयडीच्या अधिकार्‍यांना दिलेल्या माहितीत विसंगती आढळली होती. त्याशिवाय त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीशिवाय अन्य महत्वाची माहितीही सीआयडीच्या अधिकार्‍यांना दिली आहे. त्यातून अनेक महत्वाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले असून त्यानुसार आता त्यांचा तपास करण्यात आला. जामिनावर बाहेर आल्यानंतरही अमोल त्याला नदीवर धरून बसलेल्या त्या दोघांचे वर्णन तसेच त्यांची नावे सांगण्यात असमर्थ दिसून येत आहे. त्यामुळेच नदीवर बसलेले ते दोघे अद्यापही कारवाईपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.