Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Sangli › वाटेगावात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

वाटेगावात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:33AMबांबवडे : वार्ताहर 

वाटेगाव (ता. शिराळा) परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर वाढला आहे. शनिवारी मध्यरात्री या भागात बिबट्या आला होता. यावेळी त्याने केलेल्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार झाले. शिराळा- वाळवा तालुक्याच्या हद्दीत डोंगराच्या   पायथ्याशी  शिदोबाच्या माळावर नंदकुमार गुरव (रा. वाटेगाव) यांनी शेतात गोठा बांधला आहे. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने या गोठ्यातील देशी गायीच्या तीन वर्षांच्या वासरावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यामुळे वाटेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचुंबी (सातदरा) व वाटेगावचा शिदोबाचा माळ  हा  जंगलयुक्‍त परिसर आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील शेतकर्‍यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. या परिसरात नंदकुमार गुरव यांचा गेल्या अनेक वर्षांपासून गोठा आहे. गुरव हे सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात गेले होते. यावेळी त्यांना गायीचे वासरू गोठ्यात नसल्याचे निदर्शनास आले. गोठ्यात रक्‍त सांडले होते. त्यावरून वासरू उसाच्या शेतात ओढत नेल्याचे गुरव यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती  गावात पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस पाटील संतोष कारंडे यांनी या  घटनेची  माहिती  शिराळा  वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिलींद वाघमारे, वनरक्षक उस्मान मुल्ला यांनी घटनास्थळाची पाहणी करून पायाच्या ठस्यावरून हा हल्ला बिबट्याने केल्याचे सांगितले.

या परिसरात वारंवार पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले होत असल्याचे ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना सांगितले. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.