Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Sangli › तुमच्या ‘आशिर्वादा’नेच आम्ही सत्तेत! मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटील यांना टोला   

तुमच्या ‘आशिर्वादा’नेच आम्ही सत्तेत! मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटील यांना टोला       

Published On: Feb 12 2018 8:49PM | Last Updated: Feb 12 2018 8:49PMइस्लामपूर :  प्रतिनिधी

‘‘तुम्ही 31 वर्षात 115 कोटी दिले. तर, आम्ही इस्लामपूरला नुसत्या कोरड्या चकरा  न मारता 11 महिन्यात 107 कोटी आणि आता पाणी योजनेला 25 कोटी रुपये देत आहोत; अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयंतराव यांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर केली. 

‘आम्ही रस्त्यावर होतो, तुमच्या आशिर्वादाने आता सत्तेवर आहोत.  आम्हाला कुठले कारखाने-शिक्षण संस्था चालवून घरं भरायची नाहीत, तुमच्यामुळेच आम्ही सत्तेवर आलो.’ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी आ. जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून लगावला. 

इस्लामपुरात कृषी महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दौर्‍यावेळी शहरासाठी थोडा-थोडा निधी दिला असता तरी शहराचा विकास झाला असता, अशी टीका आ. जयंत पाटील यांनी शहरातील एका रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी दोनच दिवसापूर्वी केली होती. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री बोलत होते. 

आमचे दौरे कोरडे नसतात...
 जयंत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आमचे दौरे कोरडे नसतात. तुम्ही राज्याचे वित्तमंत्री होता,  मोठमोठी खाती तुमच्याकडे होती. तुम्ही किती निधी आणला? 31 वर्षात इस्लामपूरला 115 कोटी तुम्ही दिले. आता काळजी करू नका, आम्ही 11 महिन्यात 107 कोटी दिले. पाणी योजनेसाठी 25 कोटी रुपयासह 132 कोटी देणार आहोत. कोरड्या चकरा आम्ही मारत नाही.’’

शरद पवारांसह आधीच्या सरकारवर टीकास्त्रं...
केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकर्‍यांविषयी कळवळा भासविणार्‍या शरद पवार यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकर्‍यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देण्याविषयी  10 वर्षात अनुकूलता दर्शविली नाही.  2004 ला त्या आयोगाची तशी शिफारस होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा निर्णय घेतल्यावर मग पवारांची चलबिचल सुरू झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

तिजोर्‍यांचे सिंचन...
शेतकर्‍यांसाठी पाणी योजनेच्या घोषणा करणार्‍या आधीच्या सरकारने 15 वर्षात पाणी योजना रखडून ठेवल्या. टेंभू, म्हैसाळसह अन्य योजनांना 5 हजार कोटींचा निधी, 50 हजार एकर ओलिताखाली आणण्याचे काम आमच्या सरकारने केले. आधीच्या सरकारने सिंचनाच्या नावाखाली कोणाच्या तिजोर्‍यांचे सिंचन केले हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. आधीचे सरकार टँकरमुक्त परिसर व्हावा म्हणून नव्हे तर टँकर माफियांचे सरकार होते. 

3 वर्षात कर्जमाफीतून 24 हजार शेतकर्‍यांना 12 हजार कोटींची मदत दिली. तर 15 वर्षात त्यांनी मात्र 5 हजार कोटीचीदेखील मदत दिलेली नव्हती. सोयाबीनचा हमीभाव वाढावा म्हणून त्याच्यावर आयात शुल्क लावून भाव 2200 रुपयावरून 3900 रुपयांवर नेला. आधीच्या सरकारला हे शक्य होते. पण या भावांवर नियंत्रण ठेवणारे त्यांचेच नेते होते. ऊस दरासाठी निर्यातीला प्रोत्साहन व साखर आयातीला शुल्क लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. याआधी मात्र साखर आयात करणारी लॉबी आधीच्या सरकारच्या जवळची होती, असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी  यावेळी केला. 

गुलामीतून तालुक्याला बाहेर काढले...

मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूरला दौरे करून काय साधले, या आ. जयंत पाटील यांच्या टीकेवर बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, 15 वर्षे तुम्ही तालुक्याला गुलामगिरीत ठेवले. यातून बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. वाळवा, इस्लामपूरसह तालुक्याच्या विकासासाठी, रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिला आहे.