Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Sangli › पथदिव्यांची थकीत वीज बिले ग्रामपंचायतींच्या माथी

पथदिव्यांची थकीत वीज बिले ग्रामपंचायतींच्या माथी

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMसांगली : प्रतिनिधी

राज्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकित वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी मदन सोंडे यांनी काढले आहे. हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना अति तात्काळ म्हणून पाठविले आहे. 

राज्यात ग्राम पंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांचे बील शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्याच्या थकित वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली होती.  फडणवीस यांनी थेट ‘प्रकाशगड’शी संपर्क साधून ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज जोडण्याचे आदेश दिले होते. 

पथदिव्यांच्या थकित विज बिलाचा प्रश्‍न राज्यभर आहे. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची सुमारे 300 कोटींची विजबिले शासनस्तरावर थकित असल्याचे वृत्त्त आहे. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना अति तात्काळ म्हणून पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी विजबिले थकित असल्याचे निदर्शनास आले आहे. थकित विजबिलासाठी महावितरण विद्युत कंपनी वीज जोडणी खंडीत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी (ग्रामपंचायत) त्यांच्या स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून थकित बिले भागवावी. त्याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत शासनास पाठवावी’. दरम्यान ‘पथदिव्यांचे वीज बिल नेहमीप्रमाणे शासनस्तरावरूनच भागवावे.थकित रक्कमही शासनाने भरावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत केलेली आहे. 

Tags : Sangli, Sangli News, burden of street light, outstanding bills, grampanchyat