सांगली : प्रतिनिधी
येथील विजयनगर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीतील बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, आणि रोख 16 हजार रुपये, असा सुमारे एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, भर दिवसा आणि भरवस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सिद्धांत नागाप्पा म्हेत्रे (वय 54) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सिद्धांत म्हेत्रे यांचे विजयनगर येथील सिद्धिविनायक सोसायटीत श्री प्रभा नावाचा बंगला आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता म्हेत्रे कुटूंबिय लग्नासाठी परगावी गेले होते. पाठीमागे चोरट्यांनी पाळत ठेवून बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून काढला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. बेडरुममध्ये त्यांना लाकडी कपाट दिसले. त्यामध्ये लोखंडी लॉकर होते. ते लॉकर घेऊनच चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान, म्हेत्रे कुटूंबिय सायंकाळी घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
केला.