Thu, Nov 15, 2018 15:50



होमपेज › Sangli › शिंदे दाम्पत्य गायब, पथक पुण्याला रवाना

शिंदे दाम्पत्य गायब, पथक पुण्याला रवाना

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 8:56PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

शहरातील आपटा पोलिस चौकी परिसरात असणारे राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राचा चालक राज शिंदे व त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी आणखी दोन तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली. 

राज शिंदेने आलिशान वधू-वर सूचक केंद्र सांगलीतील उत्तरशिवाजीनगर येथे सुरू केले होते. तेथे कार्यालयात काम करणार्‍या मुली स्थळ म्हणून दाखविल्या जात होत्या. स्थळाचा संपर्क क्रमांक आणि पत्ते देण्यासाठी इच्छुक वरांकडून तसेच त्यांच्या पालकांकडून पैसे उकळले जात होते. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. यावेळी अनेकांकडून त्यांनी वेळोवेळी हजारो रुपये उकळले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकाला लग्नासाठी बोलावून त्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, शिंदेचे प्रताप समोर आल्यानंतर उत्तरशिवाजीनगर येथील नागरिकांनी त्याचे कार्यालय फोडून त्याला नंतर टाळे लावले. यावेळी शिंदेचा मुलगा आणि भावाला कार्यालय न उघडण्याची ताकीदही नागरिकांनी दिली होती. त्यानंतर हे कार्यालय अद्याप बंदच आहे. शिंदेने पुण्यातही असेच केंद्र सुरू केले होते. तेथेही काहीजणांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले आहे. याबाबत फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.