Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Sangli › खोकी पुनर्वसनाचा बाजार थांबणार कधी?

खोकी पुनर्वसनाचा बाजार थांबणार कधी?

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:55PM

बुकमार्क करा

सांगली : अमृत चौगुले

खोकीमुक्‍त शहर योजनेंतर्गत अनेकवेळा मुव्हेबल गाळे, व्यापारी संकुलांत खोक्यांचे पुनर्वसन झाले. परंतु यातील अनागोंदी कारभार आणि पुनर्वसनाच्या नावे चालणारा गोरखधंदा यामुळे खोकी पुनर्वसनाचा निव्वळ बाजार बनला आहे. 

काही खोक्यांचे पुनर्वसन झाले तरी नव्याने खोकी आणि त्यांचा प्रश्‍न आ-वासून उभाच असतो. यासाठी खर्‍या अर्थाने शहर खोकीमुक्‍त करण्यासाठी नि:पक्षपणे खोक्यांचा सर्व्हे, त्यानुसार एकदाच पुनर्वसन करून हा प्रश्‍न कायमचा संपविणे गरजेचे आहे. अन्यथा हा बाजार वर्षानुवर्षे सुरूच राहून मूळ हेतूला कोलदांडा बसेल. 

सांगलीत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खोक्यांचे व्यापारी संकुलात पुनर्वसनाचा निर्णय झाला. यातून सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये तब्बल 33 ठिकाणी मुव्हेबल गाळे, व्यापारी संकुले उभारण्यात आली. पण यातून खोकीधारकांच्या पुनर्वसनाच्या नावे खुलेआम बाजार फोफावला. यामध्ये खोकीधारकांऐवजी ठेकेदार, कारभारी आणि प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे कोटकल्याण झाले हे उघड आहे. त्यामुळे मूळ खोकीधारकांना खोकी हटूनही अद्याप पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या 33 ठिकाणी सुमारे 1500 हून अधिक खोकीधारकांचे पुनर्वसनही करण्यात आले. पण दुर्दैवाने 2017 संपत आले तरी उर्वरित खोकी पुनर्वसनाचा तिढा काही सुटलेला नाही. 

दुसरीकडे पुनर्वसनासाठी कर्जे काढून, सावकारी, उसनावरीतून महापालिकेकडे 40-50 हजार रुपये भरले आहेत. तरीही दहा-बारा वर्षे झाली तरी पुनर्वसन काही होत नसल्याने खोकीधारकांचे महापालिकेत हेलपाटे सुरूच आहेत. वास्तविक काढलेल्या खोकीधारकांपैकी किती खोकीधारकांना पुनर्वसनाची गरज आहे? त्यातील मूळ खोकी किती परवानाधारक आहेत, किती खोकी बेकायदा आहेत? किती जणांनी भाड्याने ती दिली आहेत, याचा लेखाजोखाच महापालिकेकडे नाही. 

उलट वारंवार खोकी पुनर्वसनाचा बाजार मांडला जातो. त्यासाठी चर्चेलाही उधाण येते. त्यातून फक्‍त चार-दोन ठिकाणी संकुले उभारायची आणि त्याचा बाजार करायचा, असाच यामागे हेतू असल्याचे दिसून येते. यातून या खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न कायमचा कुणाला सोडवायचाच नाही. तो भिजत ठेवून वारंवार पुनर्वसनाच्या नावे दुकानदारीचे भांडवल जिवंत ठेवण्यातच हेतू आहे का, असा प्रश्‍न जनता व खोकीधाकारांतूनही होत आहे. एक आराखडा तयार करूनच त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.