होमपेज › Sangli › बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:36PMमिरज : जे. ए. पाटील

मिरज तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 48 उपकेंद्रे आहेत. बेळंकी येथे एक ग्रामीण रुग्णालय आहे. प्राथमिक केंद्रात डॉक्टरांची संख्या 15 आहे. आरग येथे पद रिक्त आहे. तर एएनएम व नर्सिंग स्टाफची संख्या 64 आहे. औषधांचा पुरवठा पुरेसा आहे. तथापि रुग्ण सेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागते. तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतच्या काही गावांत बोगस डॉक्टरांचाही सुळसुळाट आहे.

कवठेपिरान, नांद्रे, कवलापूर, भोसे, एरंडोली, खंडेराजुरी, आरग व म्हैसाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. बेळंकी येथे एक ग्रामीण रुग्णालय आहे. या सर्व रुग्णालयात 15 डॉक्टर कार्यरत आहेत. आरगमध्ये एका डॉक्टरची जागा रिक्त आहे. नर्सिंग स्टाफ पुुरेसा आहे. औषधांचा पुरवठाही मुबलक प्रमाणात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज आहेत. पण  या केंद्रात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावण्याच्या घटनाही आहेत. खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे दवाखान्याच्या गेटवरच प्रसूती व्हावे लागले होते. साप, कुत्रे चावल्यानंतर रुग्णांना उपचारांची गरज असते. परंतु बर्‍याचवेळा उपचार मिळत नाहीत.

मिरज तालुक्यात म्हैसाळ व भोसे येथे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. सांगली, मिरज, कुपवाड शहर  वगळता तालुक्यात 340 खासगी रुग्णालये आहेत. खासगी दवाखान्यात एमडी पॅथॉलॉजिस्ट यांच्या नियंत्रणाखाली रक्त, लघवी तपासणीची केंद्रे असली पाहिजेत. परंतु या 19 ठिकाणी एमडी पॅथॉलॉजिस्ट शिवाय तपासणी केंद्रे आहेत.

तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतच्या काही गावांत बोगस डॉक्टरांचाही सुळसुळाट आहे. दरवर्षी बोगस डॉक्टर तपासणीची मोहीम राबविली जाते. अनेकवेळा कारवाई करुनही संबंधित बोगस डॉक्टर पुन्हा व्यवसाय करतात. म्हैसाळ येथे एका खासगी रुग्णालयातून स्त्री भ्रूण हत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकारानंतर अनधिकृतपणे होणार्‍या स्त्री भ्रूणहत्येच्या संख्येचे प्रमाण घटले आहे.