Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Sangli › सांगलीत बर्फ झाला निळा

सांगलीत बर्फ झाला निळा

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 11 2018 12:13PMसांगली : गणेश कांबळे

अखाद्य बर्फ खाणे हे आरोग्यास हानीकारक असल्याने औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येणार्‍या बर्फाला निळा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. निर्णयाचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्‍त एस. बी. कोडगिरे यांनी ‘ पुढारी’शी बोलताना दिला. औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात येणार्‍या बर्फाची विक्री खाण्यासाठीही करण्यात येते. त्याचा दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शासनाने औद्योगिक वापरासाठी येणार्‍या बर्फात 10 पीपीएफ खाद्यरंग टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी, असे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोडगिरे म्हणाले, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील बर्फ तयार करणार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील आठ व्यावसायिक उपस्थित  होते. त्यांना औद्योगिक बर्फामध्ये निळा खाद्य रंग मिसळण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार 1 जूनपासून जिल्ह्याची याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली  आहे. 

दूध, मटण, मासे साठविण्यासाठी खाण्याचा बर्फ वापरावा

औद्योगिक कारणासाठी म्हणजे कारखान्यांमध्ये  बर्फाचा वापर केला जातो. दूध, मासे, मटण टिकविण्यासाठीही बर्फाचा वापर केला जातो. सुमारे 90 टक्के बर्फ हा औद्योगिक कारणासाठी वापर केला जातो. केवळ 10 टक्के बर्फ खाण्यासाठी वापरण्यात येतो. मासे आणि दूध तसेच अन्नाशी थेट संपर्क येणार्‍या पदार्थामध्येही खाण्याच्या बर्फाचा वापर करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक बर्फाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे बर्फामधील जंतूचा संसर्ग अन्नामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध, आणि मासे, मटण साठविण्यासाठीही आता खाण्याचा बर्फ वापरावा लागणार आहे. याची तपासणी आम्ही वेळोवेळी करणार आहोत असेही  ते म्हणाले. 

स्वच्छतेचे निकष पाळणे आवश्यक औद्योगिक कारणासाठी तयार करण्यात येणार्‍या बर्फामध्ये निळा रंग टाकण्यात येणार आहे. परंतु खाण्यासाठी बर्फ तयार करताना तो पारदर्शक पांढरा असणे आवश्यक आहे. कारखान्यामध्ये स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. बर्फ तयार करण्यासाठी प्रशिक्षित  कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच परिसर हा स्वच्छ असणे आवश्यक आहे. पाणी, बर्फ यांची हाताळणी आणि ठेवण्याची जागाही स्वच्छ असली पाहिजे. कोणत्याही जंतूचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

अशुद्ध बर्फापासून होणारे आजार

अखाद्य बर्फ तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा तसेच तलावातील पाण्याचा वापर केला जातो. त्या पाण्यामध्ये अनेक विषाणू, जंतू असतात. त्याचा वापर खाण्यासाठी केल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. मानवी विष्टेमध्ये असणारा ‘ई- कोलाज’ हा जिवाणू त्यामध्ये असू शकतो. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, जुलाब, कॉलरा, काविळ, विषमज्वर आदी जलजन्य आजार होण्याची शक्यता आहे. हाच बर्फ मासे, मटण साठविण्यासाठी केला तर त्याचा थेट संपर्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यातूनही आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अखाद्य बर्फ खाणे टाळावे, असे आवाहन कोडगिरे यांनी केले. 

खाण्याच्या बर्फामध्ये रंग हवा : लालवाणी

जिल्ह्यातील बर्फाचे व्यावसायिक तेजूभाई लालवाणी म्हणाले, 1 जून पासून अखाद्य बर्फामध्ये रंग मिळण्याचे आदेश आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. परंतु अखाद्य बर्फाची विक्री ही 90 टक्के आहे. आणि खाण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ केवळ 10 टक्के आहे. कारण अनेक घरांमध्येदेखील फ्रिजची सोय झालेली आहे. त्यामुळे खाण्याच्या बर्फामध्ये रंग मिळण्याची गरज होती. अखाद्य बर्फामध्ये रंग मिळण्याची सक्‍ती ही अव्यवहार्य गोष्ट आहे. खाण्याचा बर्फ हा नेहमी पिण्यात येणार्‍या पाण्यापासूनच तयार केला जातो. आणि खाण्याच्या बर्फामधील ‘बॅक्टोरोलॉजीकल’ टेस्ट करण्याची यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. अखाद्य बर्फ खाणे टाळावे, असे आवाहन कोडगिरे यांनी केले.