Sun, May 26, 2019 16:38होमपेज › Sangli › सांगलीत गुंडाचा निर्घृण खून

सांगलीत गुंडाचा निर्घृण खून

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील हनुमाननगर येथील तिसर्‍या गल्लीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंडाचा डोक्यात कोयत्याने तीक्ष्ण वार करून, दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. गणेश बसाप्पा माळगे (वय 28, रा. त्रिमूर्ती कॉलनी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. धनंजय गवळी याने पूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, याप्रकरणी माजी नगरसेवक राजू गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

गणेश माळगे पत्नी, दोन मुलांसमवेत त्रिमूर्ती कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ राहत होता. सहा महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून गणेशने धनंजय गवळी याच्यावर खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्यात गणेशला अटक करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास  गणेश हा ओंकार पाटील व प्रथमेश कदम यांच्यासोबत मोटारसायकलवरून (एमएच 10 सी के 3585) हनुमाननगर येथील तिसर्‍या गल्लीत गेला होता. 

तेथे गेल्यानंतर ते माजी नगरसेवक राजू गवळी यांच्या घरीही गेले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर  ओळखीचा एकजण दिसल्यावर गणेश त्याला भेटण्यासाठी गाडीवरून खाली उतरला. यावेळी ओंकार पाटील गाडी सुरू करून तेथेच उभा होता. त्यावेळी एकजण तेथे आला आणि त्याने मोटारसायकलची चावी काढून घेतली. त्यानंतर काही वेळातच धनंजय गवळी तेथे आला. त्याने पूर्वीच्या भांडणाचा जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर गणेशने त्याच्या दोन्ही मित्रांना ‘पळून जा’ असे सांगितले व तो स्वतःही तेथून पळून जाऊ लागला.  शंभर मीटर अंतरावर गेल्यानंतर गणेश थांबला. तोपर्यंत धनंजय गवळी त्याच्याजवळ पोहोचला होता. नंतर गणेशचे दोन्ही मित्र थोड्या अंतरावर जाऊन लपून बसले. 

याचवेळी धनंजयने कोयत्याने गणेशच्या डोक्यात, मानेवर, हातावर जोरदार वार केले.  त्याच्या अन्य सहा साथीदारांनीही गणेशवर हल्ला केला.कोयत्याचे वार झाल्यानंतर गणेश रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळला. नंतर एका हल्लेखोराने तेथील दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. नंतर हल्लेखोर निघून गेले. गणेश गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचे दोन्ही मित्र त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

सिव्हीलजवळ समर्थकांची गर्दी

दरम्यान गणेश माळगे याचा खून झाल्याची बातमी समजताच सिव्हील परिसरात त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सिव्हील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे  तातडीने घटनास्थळी गेले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकार्‍यांना तपासाच्या सुचनाही दिल्या. खुनाच्या घटनेनंतर हनुमाननगर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दहा वार करून डोक्यात दगड 

गणेश याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. डोके, मान, हात, पाठीवर तब्बल दहा वर्मी घाव घालण्यात आले आहेत. अखेरीस त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी गणेशने केलेल्या हल्ल्याचा धनंजय गवळीने बदला घेतल्याची चर्चा हनुमाननगर परिसरात होती.