Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Sangli › ब्लॉग : थर्ड अंपायर - चोरांची धडाकेबाज मोहीम

ब्लॉग : थर्ड अंपायर - चोरांची धडाकेबाज मोहीम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिंतामणी सहस्रबुद्धे

प्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक (कै.) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘चोरांचं संमेलन’ नावाचा एक विनोदी लेख लिहिला होता. तो प्रचंड गाजला होता. राज्यातले सगळे चोर एकत्र येऊन एकदा संमेलन भरवतात. त्यामध्ये त्यांच्या नेत्यांची पल्लेदार भाषणं होतात. विविध ठरावही मंजूर होतात. चोरीच्या कौशल्याचा आणखी विकास कसा करता येईल, याबद्दल साधकबाधक चर्चा होते. मात्र संमेलनाचं सूप वाजल्यावर सहभागी सदस्य आणि नेते अशा सगळ्यांच्याच धक्का बसतो. कारण संमेलनस्थळी प्रत्येकाची काही ना काही तरी चीजवस्तू लंपास झालेली असते. कारण सगळेच नामांकित चोर तिथं एकत्र आलेले असतात. त्यामुळं ‘अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी’ या उक्तीनुसार प्रत्येकजण जाता-जाता आपलं हस्तकौशल्य दुसर्‍याला दाखवून गेलेला असतो. त्यामध्ये संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष किंवा सचिव अशा कुणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही.

सध्या सांगलीत चोरांचा झालेला सुळसुळाट पाहिला की, श्रीपाद कृष्णांच्या त्या लेखाची आठवण होते. कारण सध्या दररोज घरं फोडली जात आहेत. दुकानं लुटली जात आहेत. रस्त्यावरून चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. एटीएमवर दरोडे पडत आहेत. चोरी किंवा घरफोडी घडली नाही असा एकही दिवस मोकळा जात नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या वातावरणावरून असं वाटू लागलं आहे, की सद्यस्थितीत आसपासचे सगळे चोर, लुटेरे, घरफोडे, उचले, लफंगे, भामटे यांची सांगलीत गर्दी झाली आहे. त्याचं जणू संमेलनच इथं सुरू आहे. त्या सगळ्यांनी इथं येऊन हात धुवून घ्यायला सुरुवात केली आहे. या चोरट्यांमध्ये स्थानिक किती आणि परगावचे किती याचा काही पत्ता लागत नाही.पोलिस मात्र हातावर हात ठेवून बघ्याच्या भूमिकेत आहेत.

याचा अर्थ यापूर्वी पोलिस फार तत्पर होते. चोरी शोधून काढत होते. तातडीनं चोरटे शोधून त्यांना गजाआड करीत होते असं बिलकूल घडत नव्हतं. उलट पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद कुणी द्यायला आलं तर शक्यतो नोंद न करता त्याला वाटेला कसं लावता येईल, याचाच विचार प्रथम केला जात होता. फारच कुणी रेटा लावला किंवा दबाव आणला तर
स्टेशन डायरीत नोंद करून घ्यायची आणि ‘तपास करतो’ असं ठराविक उत्तर दिलं जायचं. मोठी चोरी असेल आणि व्यक्ती वजनदार असेल तर घटनास्थळी जाऊन पंचनामा वगैरे सोपस्कार करायचे. कागदपत्रं रंगवायची असं घडत होतं. चोरीचा तपास काही होत नव्हता. आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

त्याचवेळी अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळं सध्या पोलिस दबकून आहेत. हादरलेले आहेत. कारण चोहो बाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार होतो आहे. त्यामुळे त्यांचा मुळातच कमी असलेला धाक आणखी कमी झाला आहे, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कदाचित त्यामुळेही समस्त चोरट्यांनी उचल खाल्ली असावी. त्यांनीही आपले हात मोकळे
सोडले असावेत. त्याचा परिणाम म्हणजे सांगली शहर आणि जिल्ह्यातलेही सामान्य नागरिक असुरक्षित बनले आहेत. घर किंवा बंगल्याला कुलूप लावून कुठं जायची सोय राहिलेली नाही. तासा-दीड तासासाठी कुणी घर बंद करून बाहेर गेला तर परत येईपर्यंत कुलूप मोडून काढून चोरट्यांनी घर साफ केलेलं असतं. त्यामुळे लोक चक्रावून गेले आहेत. धास्तावलेले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत तर चोरट्यांनी जणू घरं धुवून काढण्याचा सपाटाच सुरू केला आहे. जाता जाता रस्त्यात एखाद्याची लूटमार होत आहे. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचे दागिने पळवले जात आहेत. रेल्वेचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही. रात्री झोपलेल्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल फोन किंवा पैसे पळवले जात आहेत. रेल्वे पोलिस केवळ अशा चोर्‍यांची नोंद करीत आहेत. दारात किंवा दुकानाच्या बाहेर रस्त्यावर उभी केलेली दुचाकीही हातोहात पळवली जाते आहे. उभ्या मोटारींचे पार्ट काढून नेले जात आहेत. बंद घर फोडल्यावर चोरटे अचूकपणे घरात ठेवलेले दागिने किंवा पैसे यांच्याप?र्यंत पोहोचत आहेत. तिजोरीच्या किल्ल्या शोधून काढून ती उघडत आहेत. स्वयंपाकघरात डबे, पातेली यामध्ये दडवून ठेवलेली रोकड किंवा किडूक-मिडूक दागिनेही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यामुळं चोरट्यांनी लोकांच्या मानसिकतेचा आणि सवयींचा केवढा अभ्यास केला आहे, तेही दिसून येतं आहे.

चोरट्यांच्या या उच्छादामुळं लोक मात्र त्रस्त झालेले आहेत. पोलिसांनी या त्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी रात्रीच; नव्हे तर दिवसाही ठिकठिकाणी गस्त सुरू करायची वेळ आली आहे. पूर्वी मध्यरात्रीच्या वेळी किंवा अमावस्येच्या आसपास अंधारात घरफोड्या किंवा लूटमार होत असे. आता दिवसाढवळ्या तसे प्रकार होत आहेत. यावरून चोरट्यांचं धाडस किती वाढलं आहे आणि त्यांना पोलिसांची भीती बिलकूल राहिलेली नाही,असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना आता विशेष मोहीमच सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी दिवसाही ठिकठिकाणी तपासणी सुरू केली पाहिजे. त्याचबरोबर रात्री नऊपासूनच विस्तारित किंवा मुख्य शहरापासून दूर असलेल्या भागातही पोलिसांची गस्त सुरू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांचा शोध घेण्यात तत्पर आणि हुशार असलेल्या पोलिसांना डी.बी. किंवा एल.सी.बी.त संधी देण्याची गरज आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच गुन्हेगारांचीही संख्या वाढलली आहे. त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारलेले आहे. ते लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणार्‍यांची अद्ययावत माहिती जमा करण्याची गरज आहे. संगणकामुळं ते आता सहज शक्य आहे. अनेकदा अशा प्रकारच्या गुन्ह्यांत तेच तेच गुन्हेगार सामील असल्याचे स्पष्ट होत असते. गुन्हे शोध पथकातील पोलिसांना केवळ त्याच कामावर लक्ष केंद्रित करायची शिस्त लावण्याची आणि मोकळीकही देण्याची गरज आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळणं, त्यांची छोटी मोठी कामं करणं किंवा अन्य प्रकारची ‘कामगिरी’ पार पाडणं असल्या साईड बिझनेसमधून त्यांना बाजूला काढण्याची गरज आहे. तरच ते गुन्हे शोधण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.

पोलिसांचा गुन्हेगारांना धाक हवाच. तो राहिला नाही तर गुन्हेगार मोकाट सुटतील. मात्र तो धाक दाखवताना किंवा पोलिसिंग करताना तारतम्यही ठेवले पाहिजे. नवे जिल्हा पोलिस अधीक्षक तडफदार आणि शिस्तप्रिय आहेत. ते सांगली पोलिस दलालाही शिस्त लावतील. कर्तव्यदक्ष बनवतील, सामान्यांना, निरपराध लोकांना दिलासा देतील आणि त्याचवेळी गुन्हेगारांत धाक निर्माण करतील. तसेच चोर्‍या, दरोडे, घरफोडी, चेनस्नॅचिंग अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू करतील, अशी लोकांची अपेक्षाच नव्हे; तर खात्री आहे.