Thu, Jul 18, 2019 21:20होमपेज › Sangli › भ्रष्ट सरकार उलथवून टाकू या

भ्रष्ट सरकार उलथवून टाकू या

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

राज्य आणि केंद्रातील  जनताविरोधी, हुकूमशाही वृत्तीचे  आणि भ्रष्ट सरकार उलथवून टाकू या. त्यासाठी  कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून कामाला लागावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदेश प्रभारी मोहनप्रकाश यांनी केले. काँग्रेसच्या ‘व्हिजन 2019’ कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, आमदार शरद रणपिसे आदी उपस्थित होते. संयोजन शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.

चव्हाण म्हणाले,  केंद्र व राज्याचा चार वर्षांचा कारभार पाहता, सर्व आघाड्यांवर भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणारे मोदी सरकार भ्रष्टाचारात जगात नंबर वन बनले आहे. मोदींनी विमान खरेदीत 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. जी बुलेट ट्रेन फ्रान्स, चीनसह अन्य देश निम्म्या किंमतीत द्यायला तयार होते, त्यांचे प्रस्ताव डावलून जपानची 1 लाख 10 हजार कोटी रुपयांची बुलेट ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या हितासाठी महाराष्ट्रावर 50 हजार कोटी रुपयांचा वरवंटा फिरविला जात आहे. 

चव्हाण म्हणाले, विदेशातील काळा पैसा परत आणतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. जनतेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. काळा पैसा असलेल्या 1400 भारतीय लोकांची यादी गेल्या चार वर्षांपासून मोदींजवळ पडून आहे. देशातील सर्व बुडवे हे मोदी यांचे मित्र आहेत.

ते म्हणाले, त्यामुळे इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार हे मोदींचे आहे. तरुणांना नोकर्‍या नाहीत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न जैसे थे आहेत. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप सरकारने सत्तेवर येताना धनगर, मराठा, ओबीसींना आरक्षणे देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र आरक्षणाचा प्रश्‍न मिटला नाही. उलट जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे मंत्री भेटवस्तू वाटा, अशी आमिषे दाखवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

 प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महापौर हारुण शिकलगार, सभापती बसवेश्‍वर सातपुते, किशोर जामदार, यशवंत हाप्पे, प्रा. सिद्धार्थ सातपुते, संजय मेंढे, संतोष पाटील,अमित पारेकर, राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.