Mon, May 27, 2019 01:08होमपेज › Sangli › विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘बायोमेट्रिक’ने

विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘बायोमेट्रिक’ने

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:24PMइस्लामपूर : मारूती पाटील

राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील (विज्ञान शाखा) विद्यार्थ्यांची उपस्थिती यापुढे बायोमेट्रिक पध्दतीने सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे नियमित वर्गांना दांडी मारून  कोचिंग क्‍लासना हजेरी लावणार्‍या विद्यार्थ्यांना चाफ बसणार आहे. 

अनेक महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता केवळ प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. तसेच नियमित वर्गाऐवजी खासगी कोचिंग क्‍लासमध्ये उपस्थित राहतात. यासाठी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी  खासगी शिकवणी वर्गासोबत सामंजस्य करारही केला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी शिकवणी वर्गात उपस्थित राहतात व नियमित वर्गाला अनुपस्थित राहतात, अशा अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. विधीमंडळातही लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. याची दखल आता राज्यशासनाने घेतली आहे. 

यापुढे सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागात सर्व कनिष्ठ महाविद्यालयात (विज्ञान शाखा) विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्यात येणार आहे. यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री महाविद्यालयांनी महिन्याच्या आत स्वत: उपलब्ध करून घ्यायची आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी ही योजना कार्यान्वित झाली की नाही, याचा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. तसेच वेळोवेळी महाविद्यालयांना भेटी देऊन बायोमेट्रिक पध्दतीची तपासणीही करायचीआहे. या पध्दतीचा अवलंब न करणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा आदेशही शासनाने दिला आहे. त्यामुळे खासगी क्‍लासेसना पाठबळ देणार्‍या महाविद्यालयांचे  धाबे दणाणले आहेत.