होमपेज › Sangli › हुतात्मा समूहाचा आधारच हरवला 

हुतात्मा समूहाचा आधारच हरवला 

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 9:03PMवाळवा : प्रतिनिधी

शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचा आधार हरविला आहे, असे मत हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. हुतात्मा कारखाना कार्यस्थळावर शोकसभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये अनेक कर्तबगार माणसे जन्माला आली. त्यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांचा उल्‍लेख करावा लागेल. महाराष्ट्रातील एका राजकीय व्यक्तीने केलेला विकास व त्यामधून अनेकांचे संसार उभे राहिले हा सर्व इतिहास नजरेसमोर आला. 

विशेषत: 1985 सालापासून क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा व हुतात्मा कारखाना यांच्या प्रत्येक घडामोडीत अण्णांचे मानसपुत्र म्हणून जी जबाबदारी पडेल ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आटपाडी पाणी परिषदेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी म्हणून काम न करता महाराष्ट्रातील शैक्षणिक, शेती व सहकार यामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. अशा  या  सर्वांना हवासा वाटणार्‍या डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने आपले हुतात्मा संकुलाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या विचाराने भविष्यात आपण मार्गक्रमण करूया. 

शोकसभेत हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवानराव पाटील, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, हुतात्मा बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, हुतात्मा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अजित वाजे आदी उपस्थित होते.