Fri, Apr 26, 2019 01:38होमपेज › Sangli › जिल्ह्यात सावकारी पाश पुन्हा घट्ट होतोय

जिल्ह्यात सावकारी पाश पुन्हा घट्ट होतोय

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:10PMसांगली : अभिजित बसुगडे

इस्लामपूर येथे पठाणी व्याज वसूलीसाठी महिला सावकाराने घरच बळकावले तर मिरजेत सावकराच्या भीतीने एक युवक बेपत्ता झाला आहे. यासह अन्य घटनांमुळे जिल्ह्यात सावकारीचा पाश पुन्हा आवळत असल्याचे चित्र आहे. सावकारांकडून वसूल केल्या जाणार्‍या पठाणी व्याजामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अनेकजण सावकारांचा तगादा आणि धमक्यांमुळे बेपत्ता झाले आहेत. अशा सावकारांवर कारवाई करताना पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. 

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी काही प्रमाणात सावकारांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सावकारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या सावकारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. बचत गट, भिशी मंडळे यांच्या माध्यमातून सावकारांनी त्यांच्याकडील कोट्यवधी रूपयांचा ब्लॅक मनी भरमसाठ व्याजाने अनेकांना दिला आहे. 

व्हाईट कॉलर लोकांच्या मध्यस्थीतून या सावकारांचा धंदा बिनबोभाट सुरू आहे. अनेक सावकारांनी शेतकर्‍यांसह असहाय्य लोकांच्या जमिनी, घरे, दागिने, वाहने कवडीमोलाने घशात घातली आहेत. अडलेल्यांकडून कोरा मुद्रांक, धनादेशांवर सह्या घेऊन पंचवीस ते तीस टक्के व्याजाने पैसे दिले जात आहेत. त्याचे पठाणी पद्धतीने व्याजही वसूल करून घेतले जात आहे. पैसे देताना सुरुवातीलाच व्याज कापून घेतले जाते. त्यानंतर भरमसाठ व्याज वसूल केल्यानंतर जमिनी, घरे, गाड्या जप्त केल्या जात आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सावकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी सावकारीचा नवा धंदा सुरू केला आहे. जुजबी पैशासाठी अशा सावकारांकडे वसुलीचे काम करणार्‍या पंटरांची संख्याही वाढत आहे. त्यातूनच अपहरण करून, कोंडून घालून मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यातूनही कोणी पोलिसांकडे तक्रार केली तर राजकीय ‘गॉडफादर’ला हाताशी धरून प्रकरण ‘मॅनेज’ करण्यात या सावकारांचा चांगलाच हातखंडा बसला आहे. 

अनेक ठिकाणी महिलाही या सावकारीच्या व्यवसायात उतरल्याचे चित्र आहे. व्याजासाठी घर जप्त करणार्‍या एका महिला सावकाराला पोलिसांनी तातडीने अटक केली; पण तक्रार देऊनही पैसे परत दिल्याचा पुरावा नसल्याने पोलिसांकडून तक्रार अर्जाला केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे सावकाराच्या छळाला कंटाळलेल्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सावकारांच्या त्रासाला कंटाळून आजपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, व्याजाला चटावलेले सावकार आणि यंत्रणेतील सावकारांचे लाभार्थी तक्रारदारांनाच दमदाटी करताना दिसून येतात. त्यामुळे या सावकारांचा बिमोड करणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उदंड झालेले सावकार आणि त्यांना पाठीशी घालणारे लाभार्थी यांचा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सावकार आणि त्यांच्या समर्थकांचा तातडीने बंदोबस्त  करणे सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक  आहे. 

पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई...

एखाद्या सावकाराविरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा तक्रारदारालाच पोलिसांकडून फैलावर घेतले जाते. त्यानंतर त्याच्याकडे काही लेखी पुरावे आहेत का याची विचारणा केली जाते. नंतर त्याचा अर्ज घेऊन विधी विभागाच्या परवानगीनंतर पुढील कार्यवाही करू असे सांगण्यात येते. विधी विभागाकडे असे अर्ज तातडीने पाठविले जात नाहीत. पाठविले तरी त्यामध्ये त्रुटी निघतात. त्यामुळे सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात अडसर निर्माण होत आहे. त्यात पोलिसांचे थेट सावकारांशी लागेबांधे असल्यामुळे कारवाईस दिरंगाई केली जात आहे. 

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही सावकारी...

सांगली जिल्ह्यातील सावकार पठाणी व्याज वसुली करून इतके गब्बर बनले आहेत; की त्यांनी आता कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही हातपाय पसरले आहेत. त्या जिल्ह्यांतील काही गुन्हेगारांना हाताशी धरून तेथेही सावकारी केली जात आहे. कोल्हापूर येथील एका व्यापार्‍याला सांगलीतल्या सावकारांनी पैसे दिले होते. त्या व्यापार्‍याने आत्महत्या केल्यानंतरच या सावकाराला अटक करण्यात आली. थोड्याफार फरकाने सर्वच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्यातील सावकार आणखी हातपाय पसरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.