Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Sangli › ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन

Published On: Sep 04 2018 8:21AM | Last Updated: Sep 04 2018 11:02PMसांगली : प्रतिनिधी 

हमाल, माथाडी, महिला कामगार, विविध असंघटित क्षेत्रातील कष्टकर्‍यांचे  दैवत, ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम (वय 86) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कामगार, कष्टकरीवर्ग हळहळला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगली मार्केट यार्ड, फळमार्केट येथे बंद पाळून बापूसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

त्यांचे पार्थिव सकाळी  सांगली मार्केट यार्डात हमाल भवनमध्ये  अंत्यदर्शनासाठी ठेवले होेते. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबुराव गुरव, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयश्री पाटील, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सांगली कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा,  माजी महापौर सुरेश पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड  आणि  राजकीय, सामाजिक व कामगार क्षेत्रातील मान्यवर, हमाल, कष्टकर्‍यांनी अंत्यदर्शन घेतले. बापूसाहेब यांचे चिरंजीव आणि हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम यांचे सांत्वन केले. हमाल पंचायतचे बाळासाहेब बंडगर, यशवंत सावंत, गोविंद सावंत,  प्रल्हाद होनमाने व प्रतिनिधी, हमाल, महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना शोक अनावर झाला होता. 

पंचमुखी मारूती रस्त्यावरील ‘कष्टकर्‍यांची दौलत’ येथेही  पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. अमरधाम स्मशानभूमीत शोकसभा झाली. डॉ. आढाव म्हणाले, बापूसाहेब यांचे जीवन लोकशाही, समाजवादी चळवळीशी जोडले होते. हमाल, कष्टकर्‍यांची चळवळ त्यांनी सायकलवरून फिरून उभी केली. हमाल, असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकर्‍यांना संघटित करून त्यांना न्याय दिला.50 कोटी असंघटित कामगारांना न्याय मिळवून देणे, पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटित लढा उभा करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. 

प्रा. गुरव म्हणाले, बापूसाहेब यांच्या निधनाने हमाल, कष्टकर्‍यांनी पोरके झालो असे मानू नये. विविध संघटना, संस्था हमाल व कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवतील. 

वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संजय पाटील,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,  चेंबरचे अध्यक्ष शरद शहा,  ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी,  शेकापचे अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांनी बापूसाहेब यांना श्रद्धांजली वाहिली. 

कष्टकर्‍यांचे संघटक

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते  म्हणून बापूसाहेबांनी  कष्टकर्‍यांसाठी काम सुरू केले. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी फार मोठा संघर्ष केला. मैलकुली, हमाल, मापाडी, काच-पत्रा गोळा करणारे, हळद कारखान्यातील  महिला कामगार अशा  असंघटित क्षेत्रातील कष्टकर्‍यांचे फार मोठे संघटन त्यांनी उभे केले. त्यांच्या चळवळीमुळे माथाडी बोर्डाची सांगलीत स्थापना झाली. तसेच हमालांची पतपेढी त्यांनी स्थापन केली.