Wed, May 22, 2019 14:25होमपेज › Sangli › अंजनीतील प्रमुख रस्ते चिखलमय

अंजनीतील प्रमुख रस्ते चिखलमय

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 8:01PMतासगाव : प्रतिनिधी

पावसाळ्याच्या कालावधीत तालुक्यात सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था पहायला मिळत आहे. आमदार सुमनताई पाटील यांचे अंजनी गावसुध्दा याला अपवाद नाही. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने आमदारांच्या घरासमोरील व  गावातील इतर अंतर्गत रस्तेही खड्ड्यात गेले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह ये-जा करणार्‍या लोकांचे हाल होत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून गावातील रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. मध्यभागी खड्डेच खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. किमान पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे खड्डे मुजवून घ्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत आता पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.  गव्हाण, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी येथून सावळजकडे जाणार्‍या तसेच सावळजकडून शिरढोणकडे जाणार्‍या वाहनचालकांना गावातून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आमदार सुमनताईंच्या घरासमोरील रस्त्याची अवस्था  अतिशय दयनीय झाली आहे. मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी त्यांना भेटण्यासाठी दररोज अंजनीला येतात. आमदार सुमनताईंनी याकडे लक्ष द्यावे, ग्रामपंचायतीला आदेश देऊन खड्डे मुजवून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.