Tue, Jul 16, 2019 02:06होमपेज › Sangli › ‘सिव्हिल’मध्ये ‘सुई’ घेऊनच जा!

‘सिव्हिल’मध्ये ‘सुई’ घेऊनच जा!

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 10:59PMबसुगडे

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात असाल तर सुई सोबतच घेऊन जा, असे म्हणायची वेळ रुग्णांवर आली आहे. सिव्हिलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून इंजेक्शनसाठी आवश्यक असणारी निडलच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील डॉक्टरांसह कर्मचारी रुग्णांनाच दोन रुपयांची सुई आणण्यासाठी दुकानात पाठवित असल्याचे चित्र आहे. त्याशिवाय डॉक्टरांना आवश्यक असणारे ग्लोव्ज, ओआरएस पावडर, खोकल्याचे औषध यासह अन्य औषधांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. 

सांगलीचे सिव्हिल हॉस्पिटल (पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय) सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे. दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटक, कोकणातून रुग्ण सिव्हिलमध्ये उपचारासाठी येतात. येथील उपचारांची गुणवत्ता चांगली असल्यानेच येथील बाह्यरुग्ण विभागात रोज सरासरी हजार ते बाराशे रुग्ण तपासले जातात. 

मात्र गेल्या चार महिन्यांपासून इंजेक्शनसाठी लागणारी सुई (निडल) येथे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी रुग्णालाच ती बाहेरील दुकानातून विकत आणून द्यावी लागते. याचा त्रास रुग्णांना होत आहे. त्याशिवाय आंतररुग्ण विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे तर केवळ सुईसाठी फार हाल होत आहेत. प्रत्येकवेळी सुई आणण्यासाठी हॉस्पिटलच्या इमारतीचे चार मजले उतरून खाली यावे लागते. रात्रीच्यावेळी मात्र त्यांची फारच अडचण होते. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही सुई उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

सुईसोबतच डॉक्टरांना आवश्यक असणारे ग्लोव्जही नाहीत. येथे विविध आजारांचे हजारो रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाला तपासण्यासाठी वेगळ्या ग्लोव्जची आवश्यकता असते. मात्र ग्लोव्ज  उपलब्ध नसल्याने डॉक्टरांना  रुग्णांची तपासणी करताना  अडचणी येत आहेत. याबरोबरच ओआरएस पावडर, कफ सिरप (खोकल्याचे औषध) तसेच अन्य आजारांवरील गोळ्यांचीही येथे कमतरता आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांकडून बाहेरून औषधे खरेदी  करण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात येत आहे. याचा नाहक त्रास  रुग्णांना सहन करावा लागत आहे. कृत्रिम श्‍वासोच्छवास तसेच विषबाधा झालेल्या रुग्णाच्या पोटातील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यासाठी लागणारी नाकात घालण्याची नळीही उपलब्ध नाही. 

या सर्व वस्तूंच्या तुटवड्यामुळे सिव्हीलमध्ये रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. सुईसह औषधेही बाहेरून घ्यावी लागत असल्याने रुग्णांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे रुग्णांसोबतच येथील डॉक्टर तसेच कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सिव्हिल प्रशासन मात्र कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचेही रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. उपचारासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून रुग्णांना दिलासा देण्याची मागणीही केली जात आहे. 

महिलांसाठी एकच स्वच्छतागृह, पुरुषांची गैरसोय
सिव्हिल हॉस्पीटल मोठे असूनही तेथे पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नाही. त्याशिवाय महिलांसाठी केवळ एकच स्वच्छतागृह उपलब्ध आहे. मात्र येथे येणार्‍या रूग्णांसह अभ्यागतांची संख्या पाहता ते पुरेसे होत नाही. पुरूषांना यासाठी हॉस्पीटलच्या बाहेर जावे लागते. येथे अपंगांसाठी एक स्वच्छतागृह आहे. पण त्याचा सर्रास वापर अन्य लोकांकडूनच केला जात असल्याने ते सतत तुंबलेल्या अवस्थेतच असते. त्यामुळे स्वच्छतागृहांकडे सिव्हिल प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे. 

शासनाने औषधी खरेदी करण्यासाठी नव्याने कंपनीची शिफारस केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच औषध खरेदी करावी लागतात. प्रशासनाने यापूर्वी तीनवेळा सुईसह ग्लोव्ज, विविध औषधे गोळ्यांच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडून पुरवठा केला जात नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी बाहेरून औषधे खरेदी केली होती. सध्या त्या कंपनीकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने बाहेरून औषध खरेदीसाठी परवानगी मागितली होती. त्याला परवानगी मिळाली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत सर्व वस्तू उपलब्ध होतील. पुरूषांसाठीचे स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर महिलांसाठी नवीन इमारतीत ते उभारण्यात येणार आहे. अपंगांच्या स्वच्छतागृहाबाबत रुग्णांना वारंवार सांगूनही त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे ते सतत तुंबलेले असते. नवीन स्वच्छतागृह सुरू झाल्यानंतर तो प्रश्‍न निकालात निघेल.

- डॉ. सुबोध उगाणे, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हील, सांगली