Wed, Nov 14, 2018 14:21



होमपेज › Sangli › भाजप पदाधिकार्‍यांकडून भ्याड हल्ला

भाजप पदाधिकार्‍यांकडून भ्याड हल्ला

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:44PM



सांगली : प्रतिनिधी

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी जिल्हा भूमिअभिलेखच्या येथील कार्यालयातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत भ्याड हल्ला केल्याचा आरोप सांगली जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यांच्या निषेधार्थ गुरुवारी काळ्याफिती लावून एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन केले. 

दरम्यान, संघटनेने संबंधितावर करवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना दिले आहे. निवेदनात कर्मचार्‍यांनी म्हटले आहे, की शिंदे बुधवारी अचानक नक्कल विभागात आले. त्यांनी त्यांचे वैयक्तिक कोणतेही काम नसताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.कार्यालयातील दूरध्वनी संच उचलून आपटला. यापूर्वीही त्यांनी कार्यालयात गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तीमुळे कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जनतेने शासकीय कामकाजाबाबत तक्रारी असल्यास सनदशीर मार्गाने कारवाईची मागणी करणे गरजेचेआहे.कायदा हातात घेणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.  दरम्यान, भूमिअभिलेखचे अधिकारी विष्णू शिंदे यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

भूमि अभिलेखचे कर्मचारी निर्ढावलेले आहेत : शिंदे

भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी निर्ढावलेले आहेत. सामान्य लोकांची  कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची कर्मचारी दखल घेत नाहीत.त्यामुळे केवळ विचारणा करण्यासाठी गेलो होतो. तेथे नागरिकांना दादच दिली जात नाही. त्याबद्दल जाब विचारल्यामुळे  माझ्यावर खोटा आळ घेतला जात आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.