Sat, Apr 20, 2019 16:19होमपेज › Sangli › सांगलीत चौघांवर जोरदार हल्ला

सांगलीत चौघांवर जोरदार हल्ला

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:34PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगर येथे तिघांवर 17 जणांनी जोरदार हल्ला केला. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने तिघांना लोखंडी रॉड, दांडक्याने मारहाण करण्यात आली. 

याप्रकरणी 16 जणांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. 

करण लक्ष्मण शिकलगार (वय 23), किशोर कासीम शिकलगार (वय 26), राम दत्ता कोळी (वय 20),  हुजेफ हसन पन्हाळकर (वय 22), चिंतामणी कृष्णा शिकलगार (वय 24, सर्व रा. भारतनगर) यांना अटक करण्यात आली आहे.  एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. तर अक्षय शिकलगार, ओंकार शिकलगार व अनोळखी नऊजण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी गौरव विलास गायकवाड (वय 23, रा. भारतनगर) याने फिर्याद दिली आहे. यामध्ये गौरवसह सुधीर पांडुरंग सावंत (वय 26), केतन किशोर गायकवाड (वय 26), गणेश भगवान तोडसकर (वय 14) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

यातील संशयित जखमीपैकी एकाच्या मावस बहिणीची सातत्याने छेड काढत होते. याबाबत तिने भावाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी जखमींनी रविवारी रात्री सातच्या सुमारास संशयितांना बहिणीची छेड का काढता, असा जाब विचारला होता. त्यानंतर ते तेथून निघून गेले. भारतनगर येथील एका दुकानात थांबले होते. त्यानंतर संशयितांनी आणखी काही मित्रांना बोलावून घेतले. 

त्यानंतर सर्व संशयितांनी मिळून चौघांनाही लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी 17 जणांविरोधात मारहाण, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचजणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.