Thu, Jun 27, 2019 12:37होमपेज › Sangli › पैशांसाठी मावशीवर खुनी हल्‍लाप्रकरणी कारावास

पैशांसाठी मावशीवर खुनी हल्‍लाप्रकरणी कारावास

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

फंडाचे पैसे देण्यास नकार दिला म्हणून मावशीवर खुनी हल्‍ला केल्याबद्दल संतोष बाळासाहेब पाटील (वय 35, रा. इस्लामपूर) याला बुधवारी शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी 5 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.  हल्ल्यात जखमी झालेल्या मंदाकिनी दिनकर जाधव (वय 65, रा. इस्लामपूर)  यांना आरोपीने 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. हल्ल्याचा प्रकार 7 वर्षांपूर्वी येथील सानेगुरूजी अपार्टमेंटमध्ये घडला होता. 

मंदाकिनी जाधव यांचे मूळ गाव येडेनिपाणी आहे. त्या शिक्षिका होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्या येथील सानेगुरूजी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.दि. 18 ऑक्टोबर 2011 रोजी त्या घरात एकट्याच असताना संतोष हा त्यांच्या घरी गेला. फंडाचे आलेले पैसे मला दे, असा तगादा त्याने जाधव यांच्याकडे लावला. जाधव यांनी नकार देताच संतोषने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार केला. हल्ल्यानंतर जाधव या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. दुपारी जाधव यांचे दीर शिवाजी घरी गेले असता हा प्रकार लक्षात आला. 

याप्रकरणी वसंत मारूती मांडके यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली होती.  सरकार पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले.  फिर्यादी, जखमी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.एस. भोपळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे एस. एस. धर्माधिकारी, एम. एच. ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. पोलिस एस. एस. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी तपास कामात मदत केली. 

Tags : Sangli, Sangli News, attack, aunt for money, Islampur