होमपेज › Sangli › शेतकरी विधेयकांना विरोधी पक्षांची मान्यता

शेतकरी विधेयकांना विरोधी पक्षांची मान्यता

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी 

लोकसभा  आणि राज्यसभेत शेतकर्‍यांची  दोन  खासगी विधेयके मांडण्यात येणार आहेत. अंतिम मसुद्याला विरोधी पक्ष नेत्यांनी मान्यता दिली आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांचे  नेते एकत्र येऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

दिल्ली येथे संसद भवन येथे ऑल इंडिया किसान संघर्ष को-ऑर्डिनेशन कमिटीची बैठक नुकतीच झाली. देशातील 193 शेतकरी संघटनांतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार शेट्टी या बैठकीला उपस्थित होते. 

ते म्हणाले, शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा करण्यात यावा. तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर खर्च अधिक किमान पन्नास टक्के अधिक दर मिळावा या प्रमुख मागणीकरिता संसदेमध्ये  मांडण्यात येणार्‍या खासगी सदस्य विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या विधेयकाच्या मंजुरीसाठी ठराव करण्याचा निर्णय झाला. तसेच या सर्व ठरावाच्या प्रति राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष यांना पाठविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत  सवार्ंनी एकमुखाने या दोन्ही  विधेयकांना मान्यता दिली. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर संपूर्ण देशभर रान उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.  दि. 10 मे रोजी 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाला 161 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यादिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ते पुढे म्हणाले की, भाजपाने सत्तेमध्ये येताना शेतकर्‍यांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्याप पाळलेली नाहीत. शेतकर्‍यांनी दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यासाठी त्यांना सत्तेत बसवले आहे. तो शब्द त्यांनी पाळवा, शेतकर्‍यांची ही दोन विधयके आहेत, त्यास त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा, अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील.

बैठकीस राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार, खा. शरद यादव, खा अरविंद सावंत, जयप्रकाश यादव, खा नरेंद्र कुमार, खा. दिनेश त्रिवेदी , कृषी मुल्य आयोगचे  माजी अध्यक्ष  टी. हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी, आशुतोष गुप्ता, हानन मौला, व्ही. विजय साई रेड्डी तसेच सुकाणू समितीतर्फे निमंत्रक व्ही.एम.सिंग , किरण व्ही,  कविता के. उपस्थित होते.

Tags : sangli, sangli news, farmer bill, opposition parties, approval, MP Raju Shetty,