Mon, Apr 22, 2019 03:54होमपेज › Sangli › करणीचा कथित प्रकार उघड

करणीचा कथित प्रकार उघड

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 10:43PMसांगली : प्रतिनिधी

स्फूर्ती चौक म्हणजे विश्रामबाग या ‘हार्ट ऑफ सिटी’ होऊ पहात असलेल्या भागातील मध्यवर्ती ठिकाण. या भागाला ‘शैक्षणिक हब’ असेही म्हटले जाते. सर्व भाग ‘सुशिक्षित’ समजला जातो. परंतु महापालिकेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी याच चौकात भल्या सकाळी  कोणीतरी ‘करणी’ चे साहित्य आणून टाकले आणि एकच खळबळ उडाली. दिवसभर  या कथित प्रकाराद्दल चर्चा सुरू होती. 

एरव्ही या चौकात सायंकाळच्या वेळेला सुशिक्षित लोक एकत्र जमतात. त्यांच्यामध्ये शहराच्या विकासाच्या, देशाच्या राजकारणाच्या तासन्तास गप्पा रंगलेल्या असतात. याच परिसरात मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्याने विद्यार्थीही राहतात. त्यांचाही वावर या ठिकाणी असतो. जवळच गव्हर्मेंट कॉलनी असल्याने नोकरदारवर्गाचा वावरही मोठा आहे. शासकीय कार्यालयेही या परिसरात हलविण्यात आलेली आहेत. न्यायालयेही याच परिसरात स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे भविष्यात हा परिसर ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून ओळखला जाणार आहे. 

तसा एकूण महापालिका क्षेत्राचा हा मध्यवर्ती भाग आहे.सर्वांना स्फूर्ती देणार्‍या चौकात मात्र भलतेच घडले. कोणीतरी अंडी, लिंबू असे साहित्य आणून टाकले आणि नव्याच चर्चेला तोंड फुटले. सध्या महापालिकेची निवडणूक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने लोकांना चर्चेला आणखी एक विषय मिळाला. बघता बघता ही चर्चा सोशल मीडियावरून संपूर्ण शहरात पसरली.