Wed, Sep 19, 2018 08:33



होमपेज › Sangli › मोदींना पंतप्रधानपदाचा इगो : अण्णा हजारे(व्हिडिओ)

मोदींना पंतप्रधानपदाचा इगो : अण्णा हजारे(व्हिडिओ)

Published On: Jan 20 2018 8:38PM | Last Updated: Jan 20 2018 8:38PM



आटपाडी  : प्रतिनिधी

नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा इगो असल्याने त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात लिहिलेल्या ३० पत्रांना उत्तर दिले नाही. शेतकरयांच्या प्रश्‍नाकडे झालेले दुर्लक्ष व लोकपाल विधेयक कमकुवत केल्याने २३ मार्चला होणारे देशव्यापी लोकपाल आंदोलनाची पुनरावृत्तीच आहे. असा ठाम विश्‍वास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.

आटपाडीच्या (जि. सांगली) बचतभवन मैदानात जनलोक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या जनजागृती सभेत अण्णा हजारे बोलत होते. व्यासपीठावर संयोजक कल्पना इनामदार, राळेगणसिध्दीचे सरपंच नागेश आवटी, वीरेंद्र राजमाने उपस्थित होते.

केंद्रसरकारला अंबानी-अदाणी अशा उद्योजकांची चिंता आहे. शेतकरयांच्या प्रश्‍नाची त्यांणा काळजी नाही असा थेट आरोप करत अण्णा हजारे म्हणाले, ‘‘माझ्या आंदोलनाचा फायदा घेवून कांहीजण मुख्यमंत्री, राज्यपाल झाले. त्यामुळे आता आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना निवडणूक न लढण्याचे व राजकीय पक्षात प्रवेश न करण्याची लेखी हमी दिल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.    देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, वृध्द शेतकऱ्यांना पाच हजार रूपये पेन्शन,पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी २३ मार्चला दिल्‍लीत होणाऱ्या जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशातील ११ राज्यात दौरा झाला. लोकांच्यामधुन उत्स्फुर्त प्रतीसाद लाभत आहे. त्यामुळे २३ मार्चला देश उभा राहिल असा विश्‍वास त्यांनी व्यकत केला.

  अण्णा म्‍हणाले, ‘‘देशातील शेतीची अवस्था माल खाये मदारी और नाच करे बंदर अशी परिस्थिती आहे. शेतमालाला खर्चापेक्षा दीडपट भाव मिळाला तरच शेतकरी उभा राहिल. राज्याच्या कृषी मुल्य आयोगाने दिलेल्या अहवालात काटछाट करण्याचा अधिकार केंद्राला नाही. दराअभावी शेतमाल रस्तावर फेकुन द्यावा लागत आहे. त्यामुळे घामाला दाम मिळालाच पाहिजे अशी आमची भुमिका आहे. शेतीला बँक कर्ज देत नाही.चक्रव्याज पध्दतीने व्याज आकारले जात आहे. 72 सालापासून घेतलेले हे व्याज परत देण्यासाठी प्रयत्न करु.’’

अण्णा म्‍हणाले, ‘‘लोकपाल विधेयकाला कमकुवत करुन तीन दिवसात हे विधेयक मंजूर झाले, जनतेसाठी अत्यंत महत्वाचा कायदा मोदींनी लोकांच्या विश्‍वासाला तडा देत बनवला ही दुर्देवी बाब आहे, तो आम्हाला मान्य नाही. आमच्या मसुद्याप्रमाणे कायदा करावा याबाबत आम्ही ठाम आहोत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याची अंमलबजावणी झाली नाही, हा आयोग तात्काळ लागु करावा. 60 वर्षावरील शेतकरयांना दरमहा पाच हजार पेन्शन मिळावी याबाबतचे पेन्शन विधेयक लोकसभेत मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 

दुष्क़ाळी भागातील जनतेने राळेगणसिध्द्दीच्या धर्तीवर पाणी अडवून आपले जीवन समृध्द करावे आणि आपल्या पायावर स्वत:च उभा राहण्याचा प्रयत्न करावे असा सल्‍ला आण्णांनी यावेळी दिला. सत्ता नाही तर व्यवस्था बदलण्याची गरज आहे आणि ती तुम्ही आम्हीच बदलली पाहिजे. त्यादृष्टीने संघटीत होउन लढा द्या असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले.