Sat, Mar 23, 2019 18:43होमपेज › Sangli › राज्यातील उपसासिंचन योजनांचे वीज बिल सरकार भरणार : अनिलराव बाबर (व्हिडिओ)

राज्यातील उपसासिंचन योजनांचे वीज बिल सरकार भरणार : अनिलराव बाबर (व्हिडिओ)

Published On: Jan 19 2018 4:57PM | Last Updated: Jan 19 2018 4:57PMविटा : विजय लाळे 

संपूर्ण राज्यातील उपसासिंचन योजनांचे ८१ टक्के वीजबिल भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या क्रांतिकारी निर्णयाचा अध्यादेश आज शुक्रवारी निघाला असल्याची माहिती खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे राज्यातल्या केवळ थकीत पाणी पट्टी वीज बिलांच्या मुळे वारंवार बंद पडणाऱ्या  उपसासिंचन योजनांच्या लाभ क्षेत्रांतील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . 

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या शेतीला पाणी देणाऱ्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ या उपसा जलसिंचन योजना थकीत वीज बिलाच्या अभावी बंद ठेवण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी लाभधारक शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष पाहावयास मिळत आहे. उपसासिंचन योजनांचे वीजबिले परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सवलतीचे वीजदर लागू करावे यासाठी गेल्या वर्षभरापासून सरकारकडे आमदार अनिलराव बाबर पाठपुरावा करत आहेत. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिलराव बाबर आणि गणपतराव देशमुख यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलनियमक प्राधिकरण यांच्याशी चर्चा विनिमय करून वीज बिलात ८१ टक्के रक्कम सरकार भरेल. तर उर्वरित केवळ १९ टक्के वीज बील  शेतकऱ्यांना भरावे लागेल व हे नवीन दर येत्या उन्हाळी हंगामापासून म्हणजे फेब्रुवारी महिन्या पासून त्वरित लागू होतील, असे आश्वासन विधानसभेत दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष आज हा अध्यादेश जारी झाल्याची माहिती बाबर यांनी दिली.

ते  म्हणाले, ‘पुरोगामी महाराष्ट्राने अभुतपुर्व आणि क्रांतिकारक असा हा निर्णय घेतला आहे . त्यामुळे  शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे असे म्हणावे लागेल . याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जल नियमक प्राधिकरणाचे अध्यक्ष, सर्व संचालक, अधिकारी या सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानतो’ असे ही बाबर यांनी नमूद केले .