Tue, May 21, 2019 22:20होमपेज › Sangli › डीवायएसपींनी स्वीकारले अनिकेत कोथळेच्या मुलीचे पालकत्व

डीवायएसपींनी स्वीकारले अनिकेत कोथळेच्या मुलीचे पालकत्व

Published On: Dec 11 2017 4:34PM | Last Updated: Dec 11 2017 4:34PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली येथे नुकत्‍याच घडलेल्‍या अनिकेत कोथळे खून प्रकरणापासून जनतेत पोलिसांबाबत कमालीची नाराजी आहे. मात्र, खाकीच्या आतही माणुसकी असते. याचे उदाहरण समोर आले आहे. हिंगोलीत सेवा बजावत असलेल्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी अनिकेतच्या तीन वर्षाच्या प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांनी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना त्‍याबाबत पत्रही लिहिले आहे.

अनिकेत हा कपड्यांच्या दुकानात काम करत होता. या कामातूनच तो आपल्‍या कुटुंबाचा उदर्निवाह करत होता. मात्र, त्‍याच्या मृत्‍यूनंतर त्याच्या कुटुंबावरचे छत्र हरवले. पत्नी आणि तीन वर्षाची प्रांजल आधारहीन झाल्या आहेत. सरकारने या कुटुंबाला दहा लाख रूपयांची मदतही जाहीर केली आहे. परंतु, दहा लाख रूपयांत किती दिवस घर चालणार, या सर्व बाबींचा विचार करून सुजाता पाटील यांनी प्रांजलचे पालकत्‍व स्‍वीकारले. प्रांजलच्या शिक्षणासह सर्व खर्चाची जबाबदारी त्‍यांनी स्‍वत:वर घेतली आहे. 

प्रांजलच्या पालकत्‍वाबाबत अनिकेतच्या भावासोबत बोलणे झाले आहे. त्यांनी प्रांजलचे पालकत्व देण्याचे मान्य केले असल्‍याचे सुजाता पाटील यांनी सांगितले.