Sun, Apr 21, 2019 02:29होमपेज › Sangli › सांगली : पोलिसांच्या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू

सांगली : पोलिसांच्या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 06 2018 1:49AMसांगली : प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत कोथळेकडून आणखी गुन्ह्यांची कबुली करून घेण्यासाठी त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल आणि डीएनए चाचणीच्या अहवालात ते स्पष्ट आहे. त्यानुसार बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरोधात जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती सीआयडीचे उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली. 

सोमवारी सीआयडीचे  उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी  सहकार्‍यांसमवेत मुख्य न्यायदंडाधिकारी सौ. बी. एस. गारे यांच्या कार्यालयात आले. तेथे न्यायालयीन अधीक्षक व्ही. बी. पाटील यांच्याकडे त्यांनी सातशे पानांचे आरोपपत्र सादर केले.  

उपअधीक्षक कुलकर्णी म्हणाले, या प्रकरणातील संशयितांविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत. मृतदेहाचा डीएनए चाचणी अहवाल, उत्तरीय तपासणीचा वैद्यकीय अहवाल यामध्ये महत्त्वाचे ठरले आहेत. हे दोन्ही अहवाल संशयितांविरोधातील ठोस पुरावे आहेत. या प्रकरणाच्या तपासात शास्त्रीय पुराव्यांचा भरपूर आधार घेण्यात आला आहे. त्याशिवाय ओळखपरेडच्या आधारेच संशयितांविरोधात खुनासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या प्रकरणाचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. हा तपास अजूनही सुरूच राहणार आहे. पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमधून सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह अन्य काही तांत्रिक पुरावे अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्याशिवाय आयर्विन पुलाजवळ अमोल भंडारेला धरून बसलेल्या दोघांबाबतही तपास करण्यात येणार आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. 

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. छाती, पोटावर जाड, बोथट हत्याराने मारहाण झाल्याने त्याच्या शरीरांतर्गत रक्तस्त्राव झाला. यामध्ये फुफ्फुस, मूत्रपिंड यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात अनिकेतच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यापूर्वीच सीआयडीकडे अंतिम उत्तरीय तपासणी अहवाल, हिस्ट्रोपॅथीचा तसेच डीएनए चाचणीचा अहवाल वैद्यकीय विभागाने दिला होता. त्याचाही आरोपपत्र दाखल करताना फायदा झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सुमारे 125 जणांचे जबाब

दरम्यान याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय, तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. त्याशिवाय याप्रकरणी सुमारे 125 जणांकडे तपास करून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. 

संशयितांची चार वाहने जप्त

याप्रकरणातील संशयितांनी मृतदेह नेण्यासाठी वापरलेली पोलिस बेकर गाडी, अनिलकुमार लाड याची मारूती कार तसेच दोन मोटारसायकली अशी चार वाहने आतापर्यंत जप्त करण्यात आली आहेत. 

अ‍ॅड. निकम यांनाही प्रत पाठविली

या प्रकरणाच्या आरोपपत्राची एक प्रत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना पाठविण्यात आली आहे. याबाबत त्यांच्याशी लवकरच संपर्क करू, असेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. 

कामटेच्या ‘नार्को’साठी अर्ज

अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेची नार्को तसेच ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्याच्या परवानगीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक   सुनील  रामानंदन, अधीक्षक श्रीकांत पाठक, अतिरिक्त अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपपत्राचे काम पूर्ण करण्यात आल्याचेही उपअधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. 

  खुनासह 11 कलमांचा समावेश

कामटेसह सर्व संशयितांविरोधात खून, पुरावा नष्ट करणे, संगनमत करणे, कबुलीसाठी बळजबरीने मारहाण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे, सामायिक उद्देश अशा प्रकारची 11 कलमे या आरोपपत्रात लावण्यात आलेली आहेत, असेही उपअधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. 

  सुमारे सातशे पानांचे आरोपपत्र...

सीआयडीने दाखल केलेले आरोपपत्र सुमारे सातशे पानांचे आहे. यामध्ये संशयितांविरोधातील सर्व तांत्रिक, वैद्यकीय, परिस्थितीजन्य  पुरावे, प्रकरणाशी संबंधितांचे जबाब, मोबाईल डिटेल्स, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, अमोल भंडारेचा जबाब आदी बाबींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.