Fri, Nov 24, 2017 20:21



होमपेज › Sangli › निलंबित सात पोलिसही ‘सीआयडी’च्या रडारवर

निलंबित सात पोलिसही ‘सीआयडी’च्या रडारवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मूळ फिर्यादी अभियंता संतोष गायकवाड याची मंगळवारी सीआयडीच्या पथकाने कसून चौकशी केली. त्याशिवाय पोलिस ठाण्यातील निलंबित केलेल्या सात पोलिसांचीही चौकशी होणार असल्याचे या पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले. 

मूळचे कवलापूर येथील असलेले गायकवाड यांच्या फिर्यादीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली. आठ दिवसांपूर्वी येथील बसस्थानकात गायकवाड मुंबईतून रात्री आले होते. त्यानंतर अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे हे दोघेजण त्यांना गावाकडे सोडतो, असे सांगून मोटारसायकलवरून घेऊन चालले होते. 

कोल्हापूर रस्त्यावर त्यांना चाकूचा धाक दाखवून या दोघांनी मोबाईल आणि रोकड लुटली, अशी त्यांनी फिर्याद दिली होती. ती फिर्याद खरी आहे, का याची तपासणी हे पथक करीत आहे. त्यासाठी गायकवाड यांना बोलावून घेऊन याबाबत सत्यता तपासण्यात येत आहे. आज सुमारे दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली. 

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांच्या मारहाणीत अनिकेतचा जेव्हा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात एक हवालदार, त्याचा मदतनीस, चार गार्ड आणि एका टेलिफोन ऑपरेटरचा समावेश आहे. या गुन्ह्यात त्यांची नेमकी कोणती भूमिका होती, याची तपासणी करण्यात येणार आहे.