होमपेज › Sangli › सांगली : अनिकेत कोथळेवर अंत्यसंस्कार

सांगली : अनिकेत कोथळेवर अंत्यसंस्कार

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:48PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

तब्बल दोन महिन्यांनी अनिकेत कोथळे याचा मृतदेह सीआयडीने कोथळे कुटुंबीयांकडे गुरुवारी सुपूर्त केला. अनिकेतचा बंधू आशिष व अमित कोथळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. तेथून तो त्याच्या कोल्हापूर रोड भारतनगरमधील घरासमोर नेण्यात आला. तेथे पत्नी, आईसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अमरधाम स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीसह विविध पक्षांचे नेते, नगरसेवक उपस्थित होते.  

अनिकेत कोथळे याच्यासह अमोल भंडारे या दोघांना शहर पोलिसांनी तरुणाला लुटल्याच्या संशयावरून अटक केली होती.  दि. 6 नोव्हेंबर रोजी सांगली शहर पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह पोलिसांनी केलेल्या  मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोलीत त्याचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावली होती. 

अनिकेतचा आंबोली येथे अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान मृतदेहाचे अवशेष मिरजेच्या शासकीय महाविद्यालयात रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सीआयडीचे अप्पर अधीक्षक गायकवाड, उपअधीक्षक कुलकर्णी यांनी आज मृतदेहाचे अवशेष त्यांच्या सांगलीतील कार्यालयात आणले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेहाचे अवशेष अनिकेतच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. 

भारतनगरमधील त्याच्या घरी अंत्यदर्शनासाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी घरात गर्दी केली होती. मृतदेह दारात येताच एकच आक्रोश सुरू होता. तेथे विधी पूर्ण करून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेखर माने, युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण, शिवसेना युवानेते पृथ्वीराज पवार, जनसुराज्यशक्‍तीचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, सतीश साखळकर, संघटनेचे महेश खराडे,  अमर पडळकर, धर्मेंद्र कोळी, अश्रफ वांकर, चंदन चव्हाण, महेश पाटील, उमेश देशमुख, नगरसेवक बाळासाहेब गोंधळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांजलचे बाबा अखेर आलेच नाहीत...!
गेल्या 5 नोव्हेंबरला घरातून गेलेल्या अनिकेतचे मृतदेहरूपी अवशेष चार बॉक्समधून तब्बल दोन महिन्यांनी घरी परतले. अनिकेतची प्रांजल ही मुलगी ‘बाबा कधी परत येणार?’ असे आई, आजीला विचारत होती. आज मृतदेह दारात येताच तिने ‘या बॉक्समध्ये काय आहे?’ सवाल केला. ‘तुझे बाबा आहेत, त्यांना नमस्कार कर ’असे सांगताच तिने ‘बाबा आलेच नाहीत,’ असे म्हणत रडायला सुरुवात केली. आईने तिला नमस्कार करायला लावताच उपस्थितांचे डोळे पाणावले.