Mon, Apr 22, 2019 21:37



होमपेज › Sangli › जिल्ह्यात बँकांमध्ये चणचण

जिल्ह्यात बँकांमध्ये चणचण

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 19 2018 1:37AM



सांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांनाही चलन तुटवड्याचा फटका बसू लागला आहे. बँकांवर नोटांच्या ‘रेशनिंग’ची वेळ आली आहे. ग्राहकांना मागणीएवढी रक्‍कम मिळत नाही. त्यामुळे  बँकांना ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ‘एटीएम’ सेवा अजून तरी प्रभावित झालेली नसून ही सेवा सुरळीत आहे. मात्र, नोटांचा तुटवडा कायम राहिल्यास गरज नसतानाही पैसे काढण्याकडे कल वाढेल आणि एटीएमसमोर रांगा लागतील, अशी भीती आहे. 

देशात अनेक राज्यांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्हा अपवाद राहिलेला नाही. गेला आठवडाभर थोड्या फार प्रमाणात नोटांची टंचाई जाणवत आहे. नुकतेच जत तालुक्यातील एका मोठ्या गावात एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत नोटांच्या टंचाईचा परिणाम मोठ्या वादावादीपर्यंत जाऊन ठेपला होता. खात्यावर रक्‍कम आहे, पण गरजेइतकी रोख रक्‍कम मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप अनावर होताना दिसत आहे. प्राप्त परिस्थितीत ग्राहकांचा रोष कमी करून कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत आहे. 

जिल्हा बँक : रोजची मागणी 20 कोटींची; मिळतात फक्‍त 5 कोटी

जिल्हा बँकेला रोज पंधरा ते वीस कोटी रुपयांची कॅश लागते. ‘आरबीआय’ची करन्सी चेस्ट सुविधा असलेल्या बँकांकडून मात्र केवळ चार ते पाच कोटी रुपयेच मिळत आहेत. त्याचा फटका जिल्हा बँकेला बसत आहे. 

शंभर, पाचशे, दोन हजारांची टंचाई

करन्सी चेस्टकडून बँकांना दहा रुपये, वीस रुपयांच्या नोटा उपलब्ध होत आहेत. मात्र शंभर रुपये, पाचशे रुपये, दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. नोटांचा तुटवडा अचानक कसा निर्माण झाला, असा प्रश्‍न अनेक बँकांना सतावू लागला आहे. 

कर्ज मंजूर; पण नोटा मिळेनात

पीक कर्जाची यादी घालण्याचे काम जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये सुरू आहे. पीक कर्ज मंजूर आहे; पण गरजेइतकी रोख रक्‍कम मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.