Thu, Nov 15, 2018 01:06



होमपेज › Sangli › अग्रणी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

अग्रणी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:15PM



तासगाव : दिलीप जाधव 

अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. स्थानिक नेते आणि धनदांडग्यांनी नदीकाठावर विहीर खोदून पात्रात कचरा टाकण्याचा सपाटा लावला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपात्रच गायब झाले आहे.ग्रामपंचायत व तालुका पातळीवरील प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.  अतिक्रमण करणार्‍यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही.  परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस अग्रणीपात्र शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. डोंगरात उगम  पावलेली ही नदी  खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांतून 55 किलोमीटर प्रवास करीत  कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीला मिळते. नदीच्या उगमापासून 20 किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणातून  भव्य पात्र आज निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यातील 22 किलोमीटर पात्र वगळता  तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीतील पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.  तासगाव तालुक्यातील वायफळे, यमगरवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, मोरगाव, हिंगणगाव, देशिंग, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी, लोणारवाडी या गावांच्या हद्दीतील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.  गेली चार ते पाच वर्षे म्हैसाळच्या कालव्यातून सातत्याने पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रालगतची पाणीपातळी वाढली आहे.

पाण्याचा उपसा करण्यासाठी पात्रालगत विहीरखोदाई करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेषतः तासगाव तालुक्यातील गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव  येथील शेतकर्‍यांनी अग्रणी पात्रालगत मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या आहेत.  स्थानिक शेतकर्‍यांबरोबर तासगाव तालुक्यातील अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, मिरज तालुक्यातील करोली एम येथील काही धनदांडग्यांनी पात्रालगत जमीन खरेदी करुन विहीर खोदाई करण्याचा सपाटा लावला आहे.