Fri, Apr 19, 2019 08:43होमपेज › Sangli › मुलाचा खून करून आईवर खुनीहल्ला

मुलाचा खून करून आईवर खुनीहल्ला

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 19 2018 1:37AMसांगली ः प्रतिनिधी

शहरातील उत्तर शिवाजीनगर येथील आपटा पोलिस चौकीसमोरील अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या एकाचा डोक्यात हातोड्याचे  घाव घालून खून करण्यात आला. हितेश जयंतीलाल पारेख (वय 45) असे मृताचे नाव आहे. यावेळी मृताला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या आईवरही खुनी हल्ला झाला. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.  पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  

या हल्ल्यात मृत हितेश यांच्या आई कमला जयंतीलाल पारेख (वय 83) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मिरजेतील मिशन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हितेश एका दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होते. उत्तरशिवाजीनगर येथील आपटा पोलिस चौकीसमोर असलेल्या श्री अपार्टमेंटमधील बी विंगच्या फ्लॅट क्रमांक 5 मध्ये ते आईसोबत राहत होते. ते अविवाहित होते. 

हितेशचे भाऊ महेश बुधवारी सकाळी आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप अडकविले होते, मात्र दरवाजा उघडा होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता हॉलमधील सोफ्यावर हितेश तर आई जमिनीवर रक्‍ताच्या थारोळ्यात पडली होती. तेथे जवळच हल्लेखोराने हातोडा टाकला होता. ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. 

पोलिस निरीक्षक प्रताप पोमण सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कमला पारेख बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना तातडीने सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. हल्लेखोराने हितेश यांच्या डोक्यात हातोड्याने वर्मी घाव घातले होते. त्यामुळे हॉलमधील जमिनीवर, भिंतीवर, छतावर रक्‍ताचे शिंतोडे उडालेले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सिव्हीलमध्ये हलविण्यात आला. 

कमला पारेख यांना तीन मुलगे, दोन मुली आहेत. त्यातील एका मुलाचे निधन झाले असून हितेश त्यांच्यासोबत राहत होते. तर महेश राम मंदिर परिसरात राहतात. त्यांचा नातू सूरज त्यांच्याकडे वरचेवर येत होता. तर महेशही रोज सकाळी येऊन आईची विचारपूस करून जात होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे तिथे आल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. दरम्यान, कमला पारेख यांच्यावर मिरज येथील मिशन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

सायंकाळी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. 

अपार्टमेंटभोवती फिरले श्‍वान

दरम्यान, घटनास्थळी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र अपार्टमेंटभोवती फिरून उत्तरेकडील गेटजवळ श्‍वान घुटमळले. तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसे घेतले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.