Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Sangli › आधारमुळे रेशनचा ‘पुरवठा’ घटला

आधारमुळे रेशनचा ‘पुरवठा’ घटला

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 9:01PM

बुकमार्क करा

सांगली : शशिकांत  शिंदे 

शिधापत्रिकेला आधारलिंक करण्याचे काम सध्या गतीने  सुरू आहे.  त्यामुळे बोगस आणि अवैध शिधापत्रिका कमी होत आहेत. परिणामी जिल्ह्याला मिळणार्‍या रेशनिंगच्या धान्यात घट होत आहे. आतापर्यंत प्रतिमहिना 2300 क्विंटल गहू आणि तांदळाच्या मागणीत घट झाली आहे. 

आतापर्यंत शिधापत्रिकेचे  आधार जोडणीचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. याबाबत जिल्हा विभागात दुसरा तर राज्यात सहावा आहे. आधार लिंकिंगचे काम शंभर टक्के झाल्यानंतर  धान्य मागणीत आणखी घट होणार आहे. 

यापूर्वी  नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य  यांच्याकडून  पाच वर्षांपासून  वास्तव्य  करीत असल्याचे पत्र दिले की  शिधापत्रिका मिळत होती.  त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांची नावे  दोन शिधापत्रिकात होती.  त्याच्या आधारे काहीजण दोन्ही ठिकाणी धान्याचा लाभ घेते होते. काहीजण हे धान्य घेत नसल्याने त्याचा रेशनदुकानदारांना फायदा होत होता.  गोदामामधून   धान्य   दुकानात येण्याऐवजी थेट एमआयडीसीत गेल्याचे अनेक प्रकार चव्हाट्यावर आले. अनेक धान्य घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजली. काहींवर कारवाईही झाली, असे रेशनिंग कृती समितीचे म्हणणे आहे. 

पण आता   प्रत्येक नागरिकांना त्यांचा  आधार क्रमांक बँक खाते, गॅस, शिधापत्रिका या ठिकाणी जोडण्यास बंधनकारक केले आहे. ज्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न शहरीभागात 59 हजार तर ग्रामीण भागात 40 हजार रुपये पेक्षा कमी आहे. त्यांनाच आता धान्य उपलब्ध करून देण्यात  आहे.

बहुसंख्य बँकांनी आधार जोडणी केल्याने नागरिकांचे उत्पन्न आता उघड होऊ लागले आहे. त्यामुळे धान्याची  मागणी कमी होत आहे. सध्या प्रत्येक महिन्याला जिल्ह्यासाठी 9 हजार 826  टन धान्य येते. दोन वर्षात हा मागणीचा आकडा 2 हजार 300 क्विंटलने घटला आहे. पुरवठा विभागाकडे सध्या 3 लाख 89 हजार शिधापत्रिकांची नोंद आहे. जिल्ह्यात 1 हजार 358 रेशन दुकाने आहेत. संबंधित नागरिकालाच धान्य मिळावे, यासाठी त्यांना पॉसमशीन देण्यात आली आहेत. संबंधित अंगठे घेण्यात येत आहेत. मशिनवर नोंद घेऊनच धान्य दिले जात असल्याने पारदर्शी कारभार होणार आहे. त्यामुळे धान्याची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.