Fri, Apr 26, 2019 04:12होमपेज › Sangli › वाळवा तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प

वाळवा तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:12PMइस्लामपूर : वार्ताहर

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंद आंदोलनाला वाळवा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इस्लामपूरसह तालुक्यातील सर्व व्यवहार बंद होते. काही ठिकाणी ट्रकवरील दगडफेक व जाळपोळीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. आंदोलकांनी पुणे-बेंगलोर महामार्गासह तालुक्यातील प्रमुख मार्गावर ठिय्या आंदोलन करून रस्ते रोखून धरले होते. 

आंदोलनावेळी पुणे-बेंगलोर महामार्गावर वाघवाडी फाटा येथे काही  अज्ञात आंदोलकांनी तीन ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या. यामध्ये एक ट्रकचालक जखमी झाला. तर महामार्गावर कामेरी तसेच पेठ-सांगली रस्त्यावर इस्लामपूर, पडवळवाडी फाटा, बावची फाटा येथे टायरी पेटवून आंदोलकांनी रस्ता रोको केला. कापूसखेड येथेही टायरी पेटवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

सकाळपासूनच इस्लामपूरसह तालुक्यातील सर्वच गावातील सर्व दुकाने, शाळा, दूध संस्था बंद होत्या. एस.टी. बस सेवाही बंद होती. सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथे वाळवा पंचायत समितीसमोर पेठ-सांगली रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मारला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा पुणे-बेंगलोर महामार्गाकडे वळविला. 

दुपारी शेकडो आंदोलक वाघवाडी फाट्यावर महामार्गावर ठिय्या मारून बसले. त्यामुळे सुमारे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस उपअधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पोलिसांना अटक केलेल्यांना सोडावे लागले. 

सायंकाळी प्रभारी तहसिलदार शैलजा पाटील यांना मागण्यांचे निवेदन देवून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. शासनाने आरक्षणावर लवकर निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन हे हिंसक मार्गाने असेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. 

बोरगावात तणाव...

बंदवेळी वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे काही मुलांना निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक कोमल पवार यांनी मारहाण केल्याने गावात तणावाचे वातावरण बनले होते. बंद शांततेत सुरू असताना नाहक मारहाण झाल्याने ग्रामस्थांनी इस्लामपूर-ताकारी रस्ता रोखून धरला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर पवार यांनी माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ही मुले हुल्लडबाजी करत होते. त्यामुळे त्यांना हटकल्याचे पवार यांनी सांगितले. 

विविध समाजांचा आंदोलनाला पाठिंबा...

मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विविध समाजांनीही निवेदन देवून आपला पाठींबा व्यक्त केला. यामध्ये मारवाडी, पाटीदार, जैन, मुस्लिम, दलित समाजाचा समावेश आहे. या समाजात लोकांनी आंदोलनात सहभागी होवूनही आपला पाठींबा व्यक्त केला.