Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले

कडेगाव तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 11 2018 11:57PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

कडेगाव तालुक्यात सध्या अपघातांचीच चर्चा सुरू असून यामध्ये अनेकजणांना जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे आणि ती अद्यापही सुरूच आहे. यामध्ये वाहनचालकांचा बेजबाबदारपणा निष्पाप लोकांचा बळी घेत आहे. तर काहीअंशी पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

कडेगाव तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. यामुळे साहजिकच येथील लोकांचे राहणीमान उंचावल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांच्या गरजाही वाढल्या आहेत. अनेकजण आता चारचाकी गाडी घेऊन फिरताना दिसत आहेत.तर कॉलेजला जातानाही दुचाकी गाडीवरून जाणार्‍या तरूणांची संख्या लक्षणीय आहे. एकूणच तालुक्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या लक्षणिय झाल्याचे दिसत आहे.

तालुक्यात साखर कारखान्यांचे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्यापासून वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रात्री- अपरात्री ऊस वाहतूक केली जाते. अनेक ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डरचा आवाज मोठा करून अतिशय वेगाने वाहन चालवताना दिसतात. यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना इतर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे.

तालुक्यात मागील तीन-चार महिन्यांमध्ये अनेक मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये वांगी येथे क्रांती कुस्ती संकुलातील पैलवानांना झालेला अपघात धक्कादायक होता. येवलेवाडी, रामापूर, अंबक यासह अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले. त्यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडत आहेत.

तालुक्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. गाडीचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच अपघातांच्या संख्येत घट होण्याची आशा आहे.

Tags : sangli news, Kagagaon taluka, accidents, increased,