Tue, Mar 19, 2019 12:05होमपेज › Sangli › जीवघेणे ‘ब्लॅकस्पॉट’ पुन्हा चर्चेत

जीवघेणे ‘ब्लॅकस्पॉट’ पुन्हा चर्चेत

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 9:32PM

बुकमार्क करा
सांगली : अभिजित बसुगडे

सध्या जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या उद्घाटनानंतर अवघ्या दुसर्‍याच दिवशी वांगीजवळ झालेल्या अपघातात सहा उमद्या पैलवानांचा बळी गेला. तितकेच गंभीर जखमी झाले आहेत. या पैलवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्‍न सांगलीकरांमधून उपस्थित केला जात आहे. अपघातप्रवण क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना कागदावरच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जीवघेण्या अपघातांचे ‘ब्लॅकस्पॉट’ पुन्हा चर्चेत आले आहेत. 

जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत दहा हजार अपघातांत 4 हजार 442 लोकांचा बळी गेल्याचे दिसून येते. यामध्ये 13 हजार 211 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातांतील बहुतांशी बळी हे डोक्याला गंभीर मार लागल्यानेच झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी झालेल्या अपघात प्रशासनाला अंतर्मुख होवून विचार करायला लावणारा आहे. वांगी-कडेगाव रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुसाट वाहनांची संख्याही वाढली आहे. त्याशिवाय या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. 

चांगल्या रस्त्यामुळे वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यातच सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना शिस्तच नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. 
शिरगाव फाट्यावर झालेला कालचा भीषण अपघात ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमुळेच झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण केवळ गुन्हा दाखल करून अपघातांची संख्या घटणार का, हा खरा प्रश्‍न आहे.  

राष्ट्रीय आणि राज्य मार्गांव्यतिरिक्त आता शहरांत होणार्‍या अपघातातही बळींची संख्या वाढताना दिसत आहे. वाहनांच्या धडकेसह गाडीवरून पडून डोक्याला मार लागून मृत्यू झालेल्यांची संख्या यामध्ये अधिकआहे. यातील अनेक अपघातांमध्ये हेल्मेट वापरणारे मात्र बचावल्याचे दिसून येतात. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ मोठ्या मार्गांवर प्रवास करतानाच नव्हे तर शहरातही हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे, हेच यावरून स्पष्ट होते. 

ऊस हंगामातील अपघातांवर उपाययोजनांची गरज
जिल्ह्यात सध्या ऊस हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे बहुतांशी ट्रॅक्टर आहेत. रस्त्याशेजारीच ट्रॉल्या उभ्या करणे, परावर्तक न बसविणे यासह चालकाकडून वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. वांगीजवळ झालेल्या अपघातातील ट्रॅक्टर रिकामाच होता. त्याचा वेग अधिक होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरवर्षी ऊस हंगामाच्या काळात अपघातांमध्ये वाढ होताना दिसून येते. त्यामुळे हंगाम काळात विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. 

सांगलीतही रस्त्यांवर फलक लावण्याची गरज
सांगली शहरातील अनेक चौकही मृत्यूचे सापळे बनले आहेत.  अनेक चौकात मोठ-मोठे खड्डे पडले असून त्याचा अंदाज न आल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये डांबरी रस्त्यावर डोके आपटल्याने मृत्यू पावणार्‍यांची संख्या अधिक आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव यासारख्या शहरांत किरकोळ अपघात नित्याचेच ठरले आहेत.  वाहतुकीची कोंडी, अपुरे रस्ते यावर उपायांची गरज आहे.

मानवी चुकांमुळेच अपघात वाढले
मोटारीचे टायर फुटून किंवा ब्रेक फेल झाल्याने होणार्‍या अपघातांमध्ये घट झाली आहे. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने, ओव्हरटेक, अति वेगाचा हव्यास यामुळेच अधिक अपघात झाल्याचे दिसून येते. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविण्यानेही अपघातांमध्ये वाढ झाली आहे.  उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस दलाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे.