Mon, Nov 12, 2018 23:27होमपेज › Sangli › सांगली : इटकरे फाटा येथे कार अपघात, ३ ठार 

सांगली : इटकरे फाटा येथे कार अपघात, ३ ठार 

Published On: Jun 07 2018 10:15AM | Last Updated: Jun 07 2018 12:10PMइस्लामपूर : वार्ताहर

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील स्विफ्ट कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी (ता. वाळवा) फाट्याजवळ झाला. अपघातातील मृत व जखमी चाकण (पुणे) परिसरातील आहेत. हे सर्व जण नृसिंहवाडी येथे दत्ताचे दर्शन घेऊन पुण्याला परतत होते.

अमोल लक्ष्मण मुंगसे (वय 24, रा. वीरदवाडी, ता. खेड, जि. पुणे), दत्ता किसन जाधव (25), धनंजय किसन पठारे (25, दोघे रा. पठारवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. धीरज विजय मुंगसे (21, रा. वीरदवाडी) व रूपेश गणपती पठारे (25, रा. पठारवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळ व कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः  पाच मित्र चाकणचे राष्ट्रवादीचे नगरसेवक किरण कौंटकर यांची  गाडी (एम एच 14 एफएम-4047) घेऊन गुरुवार असल्याने नृसिंहवाडीला गेले होते. दर्शन घेऊन पहाटेच चाकणला परत  निघाले होते. येडेनिपाणी फाट्याजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालक धनंजय पठारे याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव गाडी झाडावर जाऊन आदळली.

दत्ता जाधव व अमोल मुंगसे  यांचे भागीदारीत चाकण येथे चप्पलचे शोरूम आहे. धीरज याची मोबाईल शॉपी आहे. दत्ता जाधव याचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला आहे. त्याच्या पश्‍चात वृद्ध आई, वडील व पत्नी आहे. धनंजय यालाही लहान मुलगा व मुलगी आहे. जखमी रूपेश हाही विवाहित आहे.

पाच जणही जीवलग मित्र...

या अपघातातील पाचही तरुण शालेय जीवनापासून जीवलग मित्र आहेत. ते नेहमी गडकोट किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात असतात. अमोल मुंगसे नेटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू आहे. नुकताच तो श्रीलंका येथून खेळून आला होता. गुरुवार असल्याने बुधवारी रात्री ते नृसिंहवाडीला गेले होते. रात्रभर प्रवास करून पहाटे दर्शन घेऊन ते परत फिरले होते. त्यामुळेच चालक पठारे याला झोप न आवरल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.