Sun, May 26, 2019 16:40होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेच्या 86 शाळांमध्ये ‘शून्य’ शिक्षक

जिल्हा परिषदेच्या 86 शाळांमध्ये ‘शून्य’ शिक्षक

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 8:34PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांकडील जिल्हांतर्गत बदल्यांमधील अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. या बदलीने सांगली जिल्हा परिषदेच्या 86 शाळांमध्ये एकही शिक्षक राहिला नाही. या शाळा ‘शून्य’ शिक्षकी शाळा झाल्या आहेत. जिल्हांतर्गत बदलीतील ही सर्वात मोठी त्रुटी आहे. दरम्यान या शाळांमध्ये शिक्षक देण्यासाठी पुन्हा ‘खो-खो’ रंगणार असे दिसत आहे. राज्यस्तरावरून राबविलेल्या या शिक्षक बदली प्रक्रियेवरून शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा जोरात आहे. बदली प्रक्रियेवर मत व्यक्त केल्यास कारवाईच्या बडग्यामुळे शिक्षक संघटना शांत आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शाळांकडील 2 हजार 166 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. बदल्यांमध्ये त्रुटी, आक्षेप, तक्रारी असतील तर त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 125 शिक्षकांचे त्रुटी, आक्षेप, तक्रारीचे अर्ज जिल्हा परिषदेकडे आले आहेत.  त्यावर ‘ग्रामविकास’कडे मार्गदर्शन मागविले आहे. 

जत तालुक्यावर पुन्हा अन्याय

जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेतील आणखी एक मोठी त्रुटी समोर आली आहे. जिल्ह्यातील 86 शाळांमध्ये एकही शिक्षक राहिलेला नाही. या शाळा ‘शून्य शिक्षकी’ शाळा झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 36 शाळा जत तालुक्यातील आहेत. 36 पैकी32 शाळा मराठी माध्यमाच्या व 4 शाळा कन्नड माध्यमाच्या आहेत. जत तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे वाढली असताना शून्य शिक्षकांच्या शाळांमध्ये जत तालुका आघाडीवर राहणार आहे. शिराळा तालुक्यातील 16, आटपाडी 10, कवठेमहांकाळ 5, मिरज 1, पलूस 2, तासगाव 5, कडेगाव तालुक्यातील 4 शाळा शुन्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. 

खो-खो की विस्थापितांची रवानगी

शून्य शिक्षकी शाळांची चूक दुरुस्त करण्यासाठी या शाळांवर शिक्षक पदस्थापना देणे अनिवार्य आहेत. त्यामुळे या शाळांवर शिक्षक पदस्थापनेसाठी पुन्हा ‘खोे-खो’ रंगणार की विस्थापित शिक्षकांना या शाळांवर नियुक्ती दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे.