Mon, Apr 22, 2019 12:16होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेत आज स्वीय निधीचे ‘बजेट’

जिल्हा परिषदेत आज स्वीय निधीचे ‘बजेट’

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्वीय निधीचे सन 2017-18 चे अंतिम सुधारित व सन 2018-19 चे मूळ अंदाजपत्रक शुक्रवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडले जाणार आहे. सन 2017-18 मधील खर्चाअभावी 2018-19 च्या बजेटमध्ये आरंभिची शिल्लक किती कोटी असणार याकडे लक्ष लागले आहे. शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग तसेच एलईडी खरेदीचे विषय सभेच्या अजेंड्यावर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती अरूण राजमाने हे जिल्हा परिषद स्वीय निधीचे बजेट शुक्रवारी दुपारी 1 वाजता सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. गेल्या काही वर्षातील बजेट पाहता  यावर्षीच्या बजेटमधील अखर्चित रक्कम काही कोटीत असणार आणि सन 2018-19 चे बजेट आरंभिच्या शिलकीमुळे मोठे होणार, असे संकेत मिळत होते. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अर्थ सभापती अरूण राजमाने व पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वीय निधीच्या शंभर टक्के खर्चासाठी गेल्या पंधरा दिवसात खातेप्रमुख, गटविकास अधिकार्‍यांना चांगलेच पळवले आहे. त्यामुळे सन 2017-18 चा स्विय निधीचा खर्च 75 ते 80 टक्क्यांपर्यंत जाईल व उर्वरीत 20 ते 25 टक्के रक्कम सन 2018-19 च्या बजेटसाठी आरंभिची शिल्लक म्हणून जमेला येईल, असे दिसत आहेत. 

जिल्हा परिषद स्वीय निधीचे उत्पन्न तुलनेने कमी आहे. उत्पन्नवाढीसाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीने घेतलेले निर्णय व प्रत्यक्ष झालेली उत्पन्नवाढ व भविष्यातील उपक्रम याचा लेखा-जोखा या सभेत मांडला जाणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण सभेत शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य या विभागांकडील  प्रश्‍न तसेच एलईडी खरेदीचा मुद्दा गाजणार असल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने सदस्यांनी लेखी प्रश्‍न उपस्थित केलेले आहेत. 

‘स्कूल ऑन व्हिल’वरील तरतूद, प्रत्यक्ष खर्च व त्याचा शाळांना किती लाभ झाला, याबाबतचा प्रश्‍न उपस्थित होणार असल्याचे समजते. पदोन्नती नाकारलेले शिक्षक, शाळांमधील खासगी बेकायदा शिष्यवृत्ती परीक्षा, मुक्त संचार गोठा योजनेचा आराखडा, त्यात झालेले बदल व अन्य काही विषय गाजणार असल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणार्‍यांवरील कारवाईचा विषयही काही सदस्यांनी लेखी प्रश्‍नाद्वारे उपस्थित केल्याचे समजते.