होमपेज › Sangli › भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे

भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:22PMसांगली : प्रतिनिधी

भाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सत्तेत असलेल्या नेत्यांनी पाठबळ  देऊन पक्ष बळकट करावा, असे मत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगली ग्रामीण कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सांगलीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर आदी प्रमुख नेते उपस्थित होेते.
देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका कार्यकर्ते करू शकतात. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे.

ते म्हणाले, ग्रामीण भागात सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या नेत्यांनी संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण जनतेची कामे तत्परतेने करावे. त्यांनी त्या भागातील कार्यकर्त्यांनाही काम करण्यासाठी प्रोत्साहन व बळ द्यावे. ही जबाबदारी संबंधित तालुक्यातील आमदार व मोठ्या नेत्यांचीही राहणार आहे. सततचा जनतेशी संवाद असायला हवा. ग्रामीण भागात आता पक्षाचे जाळे विस्तारत आहे. 

देशमुख म्हणाले,  पक्ष अधिक मजबुत करण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. त्या लोकांना कार्यकर्त्यांनी समजून सांगितल्या पाहिजेत. योजनांबाबतच्या अडचणीही लोकप्रतिनिधींकडे मांडल्या पाहिजेत. 

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, जिल्ह्यात भाजपची घौडदौड ही सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे. ती अशीच पुढे चालू राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी असेच कार्यरत रहावे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय टिकवावा. समन्वयाने खुप मोठे काम उभारले जाऊ शकते.

कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, वैभव शिंदे, भारती दिगडे, प्रसाद पाटील, चंद्रकांत गुट्टोगडी, सुहास पाटील, विजय पाटील, जयवंत कोरे, बंडोपंत देशमुख, चंद्रकांत अष्टीकर उपस्थित होते.