होमपेज › Sangli › अध्यक्ष, सीईओंनी दिले स्वीय निधी खर्चाचे आदेश

अध्यक्ष, सीईओंनी दिले स्वीय निधी खर्चाचे आदेश

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्वीय निधीचा खर्च अवघा 29 टक्के झाला आहे. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दि. 31 मार्चपर्यंत निधी 100 टक्के खर्च करण्याचे ‘टार्गेट’ खातेप्रमुख व गटविकास अधिकार्‍यांना दिले. निधी खर्चाची जबाबदारी अधिकार्‍यांवर राहिल, अशा स्पष्ट सुचना दिल्या. 

जिल्हा परिषदेत सोमवारी आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  डॉ. राजेंद्र गाडेकर तसेच जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

विभागनिहाय व पंचायत समितीनिहाय खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद स्वीय निधीचे सन 2017-18 चे मूळ अंदाजपत्रक 34 कोटी रुपयांचे होते. मार्च 2017 मध्ये हे अंदाजपत्रक तयार झाले. त्यानंतर दि. 17 जुलै 2017 रोजी हे अंदाजपत्रक प्रथम सुधारित झाले. ते  69.80 कोटी रुपयांचे आहे. महसुली जमा 53 कोटी आणि भांडवली जमा 16 कोटी निधीचे हे बजेट आहे. त्यापैकी सुमारे एकवीस कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरीत निधी खर्च करण्यास गतीने कार्यवाही करण्याच्या सुचना खातेप्रमुख व गटविकास अधिकार्‍यांना दिल्या. जे विभाग व ज्या पंचायत समित्या खर्चात पिछाडीवर त्यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे.  स्वीय निधीच्या खर्चाच्या अनुषंगाने आता परत बैठक घेतली जाणार नाही. शंभर टक्के खर्च करण्यावरच लक्ष केंद्रीत करावे. खर्चासंदर्भातील माहिती दररोज व्हॉटस्अ‍ॅपद्वारे कळवावी, अशा सुचनाही देण्यात आल्या.