Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेत 64 लाखांचा ‘सौर अंधार’

जिल्हा परिषदेत 64 लाखांचा ‘सौर अंधार’

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील सौर प्रकल्प देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहे. पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा करार केलेली कंपनी ‘बेपत्ता’ आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हा परिषदेत 64 लाखांचा ‘सौर अंधार’ अनुभवयास मिळाला. दरम्यान सौर प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने ‘डायटीफ्युएल’वर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली. 

जिल्हा परिषदेने मुख्यालय इमारतीवर सन 2015-16 मध्ये तब्बल 64 लाख रुपये खर्च करून 30 किलो वॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविला आहे.  जिल्हा परिषदेतील विजेवर चालणारी सर्व विद्युत उपकरणे या सौर प्रकल्पावर चालणार होती. सुरूवातीचे काही दिवस ही सौर यंत्रणा चालली. मात्र पुरवठादार कंपनीकडून देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ही सौर यंत्रणा कमी क्षमतेने काम करते. बहुतेकदा ही सौर यंत्रणा बंदच असते. त्यामुळे 64 लाख रुपये खुर्चनही जिल्हा परिषदेला सौर उजेडाऐवजी सौर अंधारच अनुभवयास मिळत आहे. 

जिल्हा परिषदेतील या सौर प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती पाच वर्षे कंपनीने करायची होती. मात्र कंपनीकडून हा करार पाळला जात नाही. त्यामुळे हा सौर प्रकल्प कुचकामी ठरला आहे. जल्हा परिषद स्थायी समिती सभा, सर्वसाधारण सभेतही अनेकदा त्यावर चर्चा झाली आहे. पुरवठादार कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे. कंपनीची अनामत रक्कमही जप्त केलेली आहे. आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 8) झाली. सदस्य जितेंद्र पाटील व डी. के. पाटील यांनी जिल्हा परिषदेतील सौर प्रकल्पाचा विषय उपस्थित केला. ‘डायटीफ्युएल’वर कारवाईस विलंब का होत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. पंधरा दिवसात गुन्हा दाखल केला जाईल, असे उत्तर कृषी विकास अधिकारी यांनी दिले होते. मंगळवारी जिल्हा परिषदेत महावितरणच्या विजेचा पुरवठा बंद होता. जिल्हा परिषदेतील सौर प्रकल्पही बंद होता. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांना मंगळवारी अंधारात काम करावे लागले. काही विभागांमधील संगणक वीजेअभावी बंद होते.