Mon, Jul 22, 2019 04:41होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेच्या 400 शाळा खोल्या धोकादायक 

जिल्हा परिषदेच्या 400 शाळा खोल्या धोकादायक 

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या 400 खोल्या धोकादायक आहेत. दुरुस्ती व नवीन बांधकामसाठी ‘डीपीसी’ अंतर्गत लहान गटाने 17 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात 48 शाळा खोल्यांसाठी 2.53 कोटी रुपयेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. त्यावरून शिक्षण सभापती तमनगौडा रवि-पाटील यांनी शिक्षण समिती सभेत जोरदार नाराजी व्यक्त केली. रवि-पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या बहूसंख्य शाळा इमारती, शाळा खोल्या चांगल्या आहेत. अनेक सेवा-सुविधा दिलेल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. मात्र 400 खोल्या धोकादायक आहेत. दुरुस्ती व नवीन खोली बांधकाम आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ‘डीपीसी’कडे प्रस्ताव पाठविला होता. 

‘डीपीसी’अंतर्गत लहान गटाचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी शाळा खोल्या दुरुस्तीसाठी व नवीन बांधकामासाठी 17 कोटी रुपये तरतूद करण्यास मान्यता दिली होती. मात्र नंतर ‘डीपीसी’ने 21 शाळा खोल्या दुरुस्तीसाठी 53 लाख आणि 27 नवीन खोल्या बांधकामासाठी 2 कोटी  जिल्हा परिषदेला दिले आहेत. दुरुस्ती व बांधकामसाठी 17 कोटींपैकी केवळ 2.53 कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळाल्याचे सांगत सभापती रवि-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

जि. प. अध्यक्ष, सभापती पालकमंत्र्यांना भेटणार

शिक्षण सभापती तमनगौडा रवि-पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या धोकादायक, जीर्ण शाळा खोल्यांची दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी 17 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून होणे गरजेचे आहे. त्यासाठी  जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मी पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख तसेच जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांची भेट घेणार आहोत. शाळा खोल्या दुरुस्ती व बांधकामासाठी जादा निधी अपेक्षित आहे.