Wed, Apr 24, 2019 16:23होमपेज › Sangli › नव वर्षात पोलिस प्रशासनात झीरो पेंडन्सी

नव वर्षात पोलिस प्रशासनात झीरो पेंडन्सी

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:08PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. अवैध व्यावसायिक, गुन्हेगारांवर कारवाईसोबतच गतीमान प्रशासनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच त्यांनी 1 जानेवारीपर्यंत झीरो पेंडन्सी करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार झीरो पेंडन्सीसाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. 

अधीक्षक शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर सुरुवातीलाच अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात सातत्य ठेवल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जावी यासाठी कच्ची नोंद हा प्रकार बंद करून टाकला. त्यालाही यश मिळाल्याने नंंतर त्यांनी नागरिकांना तक्रारी करणे, परवाने घेणे सुलभ व्हावे यासाठी नागरी सुविधा केंद्रही सुरू केले. आता या वर्षातील सर्व तक्रारी अर्जांसह पेंडिंग अर्ज निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

1 जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत झीरो पेंडन्सी झाली पाहीजे असे त्यांचे आदेश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीएनएसद्वारे प्रलंबित तक्रारी शोधून त्या निकाली काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नव्हती त्यांना दिलासा मिळाला आहे. 

त्याशिवाय अर्ज निकाली काढताना तक्रारदाराचे समाधान झालेच पाहिजे असेही आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात पोलिस प्रशासनात झिरो पेंडन्सी असेल असे सूत्रांनी सांगितले.