होमपेज › Sangli › आष्ट्यात चुकीच्या उपचाराने युवकाचा मृत्यू

आष्ट्यात चुकीच्या उपचाराने युवकाचा मृत्यू

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 11:23PMआष्टा : प्रतिनिधी

येथील डॉ. आर. एस. चौगुले यांच्या चुकीच्या उपचारांमुळे  अनिकेत कोळी या सोळा वर्षांच्या नातवाचा मृत्यू झाला आहे. संबंधित डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा सर्व कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा अनिकेतचे आजोबा नामदेव गुंडा कोळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोळी यांनी  निवेदनात म्हटले आहे की, अनिकेत  याला दि.16 फेब्रुुवारीरोजी ताप आला होता. त्यामुळे त्याला  उपचारासाठी येथील डॉ.चौगुले यांच्या दवाखान्यात नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी अनिकेतला तपासून दोन इंजेक्शन व गोळ्या दिल्या. तसेच अशक्‍तपणा असल्यामुळे  उद्या  सकाळी सलाईन देण्यासाठी त्याला घेऊन या असे  सांगितले. 

दि. 17 रोजी  तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी रक्‍त व लघवी तपासण्यास सांगितले. तसेच त्यांनी अनिकेतला दवाखान्यात दाखल करून घेतले.सलाईन लावून त्यामध्ये तीन इंजेक्शन सोडली. एक इंजेक्शन खुब्यात दिले. दुपारी अनिकेतला खोकला सुरू होऊन थुंकीतून रक्‍त पडले. ही बाब मी कंपाऊंडरच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो म्हणाला, ‘ खोकून छातीत दुखते. रक्‍त पडते. परंतु त्यामुळे काही होत नाही. तुम्ही घाबरू नका.’ डॉक्टर  व  कंपाऊंडर  घरी जेवायला गेले.

यानंतर ‘संपूर्ण अंग दुखते आहे. वेदना असह्य होत आहेत. मला घरी घेऊन चला’,  असे म्हणून अनिकेत रडू लागला. मी त्याचे हात पाय दाबले व सलाईन संपल्यावर घरी जाऊ असे सांगितले. पुन्हा  कंपाऊंडर आल्यानंतर मी  होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्याने डॉक्टरांना याबाबतची माहिती दिली. परंतु डॉक्टर खाली आले नाहीत. सायंकाळी 5.30 वाजता डॉक्टर खाली आले. त्यांनी अनिकेतची तपासणी केली. त्याची तब्बेत बिघडली असून त्याला पुढील उपचारासाठी  डॉ. कबाडे यांच्या दवाखान्यात हलवावे लागेल, असे सांगून रक्‍त व लघवीचे रिपोर्ट आणण्यास सांगितले. 

यानंतर अनिकेतला दुपारी 4.30 वाजताच डिस्चार्ज दिल्याचे पत्र दिले. त्याला दुसर्‍या  हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पण अनिकेत बेडवरून खाली फरशीवर पडून तडफडत होता. तिथेच त्याला रक्‍ताची उलटी झाली. त्याने संपूर्ण  शरीर ताणले व त्याची  तडफड थांबली. यानंतरही डॉक्टरांनी त्याला दुसर्‍या  हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.  तिथे डॉॅ.कबाडे यांनी  तपासणी करून अनिकेतचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.  मी डॉ. चौगुले यांना जाब विचारला. पण त्यांनी अजिबात दखल घेतली नाही. तसेच त्याच्या मृत्यूची नगरपालिकेतही नोंद केलेली नाही.