Tue, Jul 16, 2019 10:02होमपेज › Sangli › तरुणाची आत्महत्या; पोलिसावर गुन्हा दाखल

तरुणाची आत्महत्या; पोलिसावर गुन्हा दाखल

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:45PMमिरज : शहर प्रतिनिधी

येथील  मेडिकल व्यावसायिक अभिजित विजयकुमार पाटील ( वय 28 , रा. सुंदरनगर, मिरज) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी गांधी चौकी पोलिस ठाण्यातील हवालदार साईनाथ ठाकूर (वय 40, रा. मिरज) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अभिजितचे वडील विजयकुमार पाटील यांनी महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अभिजित याला त्याच्या वडिलांना व आईला व्यवसायासाठी पंडित नाईक व बेबी अंडीकाट यांनी एकदा 15 लाख व 18 लाख रुपये 10 टक्के व्याजाने कर्ज दिले होते. त्यासाठी लक्ष्मी निवास तिवारी यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी विजयकुमार यांच्याकडून काही कोरे धनादेशही घेतले होते.

सन 2015 पासून व्याजासाठी सावकारांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. गांधी चौकात असणार्‍या सार्थ मेडिकल स्टोअर्समध्ये येऊन वसुलीसाठी गुंडांचा वापर करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्यांनी मेडिकलच्या काऊंटरमधून काही रोकडही नेली होती. त्यामुळे पाटील हे अपमानित झाले होते. दि. 30 ऑक्टोबररोजी अभिजितने घरातच विषारी औषध प्याले होते. चार महिन्यांपूर्वी अभिजितच्या पत्नीनेही  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

अभिजितच्या वडिलांनी तक्रार दिल्याने सावकार पंडित बळवंत नाईक, लक्ष्मीनिवास भूषण प्रसाद तिवारी (दोघे रा. जयसिंगपूर), बेबी मोहन अंडीकाट (रा. झारीबाग, मिरज) यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर या प्रकरणात आता पोलिस हवालदार ठाकूर यांच्यावरही गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकारांच्या अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, आज हवालदार ठाकूर याने न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या विरोधातही हवालदार ठाकूर यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार केली होती.