Sat, Nov 17, 2018 06:14होमपेज › Sangli › दुचाकीवरून पडून युवक ठार

दुचाकीवरून पडून युवक ठार

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-कर्नाळ रस्त्यावर पसायदान विद्या मंदिरजवळ मोटारसायकल घसरून त्यावरून पडल्याने एक युवक जागीच ठार झाला. सागर दिलीप ताटे (वय 25, रा. कर्नाळ) असे मृताचे नाव आहे. रविवारी हा अपघात झाला. यावेळी त्यांना चुकविण्याच्या नादात मोटारसायकल घसरून आणखी दोन युवक जखमी झाले. 

सागर पत्नी, आई, वडील, भावासमवेत कर्नाळ येथे रहात होता. तो सांगलीतील एका सोलर कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत होता. रविवारी दुपारी दीपक रामा भोसले या मित्रासमवेत तो मोटारसायकलवरून (एमएच 10 सीपी 6590) सांगलीकडे येत होता. यावेळी दीपक गाडी चालवत होता तर सागर पाठीमागे बसला होता. 

पसायदान विद्या मंदिरजवळ आल्यानंतर त्यांना एका मोटारीने वेगाने ओव्हरटेक केला. त्यामुळे दीपकचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटारसायकल घसरून दोघेही पडले. यावेळी दीपकने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला. मात्र यावेळी मोटारसायकलचा एक तुटलेला रॉड सागरच्या कमरेत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर दोन युवक मोटारसायकलवरून येत होते. त्यांच्या समोरच ते दोघे पडल्यानंतर त्यांना चुकविण्याच्या नादात तेही जखमी झाले. विश्‍वजीत सतीश नवले (वय 18), लखन बबन सुरडे (वय 18, दोघेही रा. वाळवा) अशी जखमींची नावे आहेत.