Thu, Aug 22, 2019 03:49होमपेज › Sangli › आष्टा येथे वीज तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

आष्टा येथे वीज तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:54PMआष्टा : प्रतिनिधी

शेतात तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्‍का लागून संतोष गुंडा बंडगर (वय 24, रा. अहिल्यानगर, आष्टा) या युवकाचा मृत्यू झाला. हणमंत भगवान सावंत (वय 30, रा. अहिल्यानगर) हा तरुण जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी डांगे कॉलेजजवळ शेतात घडली. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

बंडगर व सावंत हे दोघे सोमवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन तानाजी सूर्यवंशी यांच्या शेतात उसाची भरणी करण्याच्या कामासाठी गेले होते. शेतात वीज तार तुटून पडली होती. तिला स्पर्श झाल्यामुळे संतोष जागीच ठार झाला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हणमंत सावंत यालाही  विजेचा धक्‍का बसला. तो 10 ते 15 फूट फेकला गेला व  जखमी झाला.पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास सावंत यांनी घटनेचा पंचनामा केला. महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी भेट दिली. महावितरणच्या जुन्या तारा  बदलण्याची शेतकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे; परंतु त्याकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी केली आहे. तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनीही महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.