होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या?

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या?

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 11:26PMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील सुभाष अनिल आडसूळ (वय 28, रा. ढवळवेस, तासगाव) या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यात शासनाकडून होणार्‍या टोलवाटोलवीस  कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे; मात्र तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सुभाष याच्या कुटुंबीय व मित्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः सुभाष व त्याचे वडील अनिल हे दोघे ढवळवेस येथे राहतात. अनिल  एका दूध डेअरीमध्ये काम करतात.  सुभाष हा गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथील एका खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करीत होता. गेल्या वर्षी सुभाषच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त तो दि. 22 जुलै रोजी तासगावला आला होता. 

वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याने शेतातील कामे करून जावीत, या उद्देशाने आणखी पाच-सहा दिवसांची सुटी वाढवून घेतली होती.सोमवारी शेतातील कामे करून सुुभाष लवकर घरी आला. घराला कुलूप होते. यावेळी वडिलांकडे जाऊन तो किल्ली घेऊन आला. त्यानंतर घरात  तो व त्याचे काही मित्र गप्पा मारत बसले होते.यावेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शासनाकडून होणारी टाळाटाळ याचा आता कंटाळा आला आहे. आज जर आपल्याला आरक्षण असते, तर मीसुद्धा चांगल्या नोकरीला लागलो असतो,’ अशी खंत त्याने व्यक्‍त केली होती.

दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास वडिलांसोबतत्याने जेवण केले. नंतर दोघे टी.व्ही. बघत बसले होते.आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे मराठा तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची बातमी त्याने पाहिली. त्यानंतर तो निराश होऊन आतील खोलीत निघून गेला. सुभाष अचानक उठून कुठे गेला, हे पाहण्यासाठी काही वेळाने वडिलांनी आतील खोलीत पाहिले. त्यावेळी सुभाषने साडीने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी धावत जाऊन सुभाषला  उचलून धरले व आरडाओरड करुन शेजार्‍यांना बोलावले. शेजारी आल्यानंतर सर्वांनी  त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान पहाटे साडे तीनच्या सुमारास सुभाषचा मृत्यू झाला.


मराठा मोर्चाची भूमिका माहिती घेऊन स्पष्ट करू : पाटील

याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा पाटील म्हणाले, आम्ही मराठी क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी मंगळवारी मृत सुभाष आडसूळ यांच्या घरी भेट दिली. सुभाषचे वडील अद्यापही मानसिक तणावाखाली असल्याने ते जास्त काही बोलू शकले नाहीत; मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकंदरीत सुभाषच्या आत्महत्येचे कारण हे मराठा आरक्षणाचेच असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, याबाबत मोर्चाची बैठक घेऊन व अधिक माहिती घेऊन आम्ही आमची भूमिका बुधवारी स्पष्ट करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.